‘कर्मयोगी बाबा आमटेंच्या नावे चंद्रपुरात अभ्यासिका’
By Admin | Updated: June 6, 2015 01:20 IST2015-06-06T01:20:54+5:302015-06-06T01:20:54+5:30
गोंडवाना विद्यापीठात बाबा आमटे अध्यासन केंद्र स्थापन व्हावे, यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी येथे दिली.

‘कर्मयोगी बाबा आमटेंच्या नावे चंद्रपुरात अभ्यासिका’
चंद्रपूर : कर्मयोगी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या नावाने २०१७ मध्ये चंद्रपुरात अभ्यासिका सुरू करण्यात येईल. तसेच गोंडवाना विद्यापीठात बाबा आमटे अध्यासन केंद्र स्थापन व्हावे, यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी येथे दिली.
महाराष्ट्रभूषण दिवंगत बाबा आमटे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ केंद्र सरकारने जारी केलेल्या टपाल तिकिटाचे विमोचन करण्यात आले़ यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे, महाराष्ट्र-गोवा विभागाचे डाक खात्याचे जनरल चार्ल्स रोबो आदी उपस्थित होते़ या टपाल तिकीटासाठी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पाठपुरावा केला होता़ तेव्हा ए़ राजा हे केंद्रीय दूरसंचार मंत्री होते़ प्रकाशन सोहळ्यात मुनगंटीवार म्हणाले, बाबांनी संपूर्ण मानव समाजाला सेवेची प्रेरणा दिली. बाबांचे कार्य नक्कीच प्रेरणादायी आहे.
वकिली पेशा असतानाही त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कुष्ठरुग्णांच्या सेवेत व्यतित केले. त्यांचे जीवन आनंदमयी करण्यासाठी आनंदवनाची निर्मिती केली. हेच आनंदवन जगण्याची एक नवी प्रेरणा देत आहे. समाजातील प्रत्येकाने त्यांच्या सेवेचे व्रत अंगिकारावे, असे आवाहन मुनगंटीवार यांनी केले. विद्यापीठातील अध्यासन केंद्र आणि अभ्यासिकेचा चंद्रपूर आणि परिसरातील विद्यार्थ्यांना फायदा होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमात ‘शांतिदूताचा सन्मान’ या पुस्तकाचेही प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. (प्रतिनिधी)