कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 23:03 IST2025-12-23T23:01:20+5:302025-12-23T23:03:33+5:30
Local Body Election Result: कोकणातील कणकवली नगर पंयाचतीच्या निवडणुकीत भाजपाचा पराभव करत सनसनाटी विजय मिळवणारे संदेश पारकर यांनी आज उममुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने कोकणातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर या निवडणुकीत विजयी झालेल्या अपक्ष आणि स्थानिक आघाड्यांच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना आपल्या गळाला लावण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, कोकणातील कणकवली नगर पंयाचतीच्या निवडणुकीत भाजपाचा पराभव करत सनसनाटी विजय मिळवणारे संदेश पारकर यांनी आज उममुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने कोकणातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
उद्धवसेनेचे नेते असलेल्या संदेश पारकर यांनी शहरविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपाचे उमेदवार समीर नलावडे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. दरम्यान, शिंदेसेनेचे नेते आणि कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी संदेश पारकर यांना पाठिंबा देत त्यांच्या पाठीमागे आपली ताकद उभी केल्याने निवडणुकीत रंगत आली होती. तसेच अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत संदेश पारकर हे १४५ मतांनी विजयी झाले होते. संदेश पारकर यांच्या विजयामध्ये निलेश राणे यांनी दिलेला पाठिंबा निर्णायक ठरल्याचे बोलले जात होते.
दरम्यान, अनेक वर्षांनंतर कणकवलीच्या सत्तेत पुनरागमन केल्यानंतर संदेश पारकर यांची पुढील राजकीय वाटचाल कशी राहील याबाबत उत्सुकता होती. दरम्यान, आज संदेश पारकर यांनी थेट शिंदेसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी पारकर यांच्यासोबत राजन तेली, उदय सामंत, श्रीकांत शिंदे आदी उपस्थित होते.
संदेश पारकर हे अद्याप उद्धवसेनेतच आहेत. तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली कणकवलीत निवडणूक लढवणाऱ्या शहर विकास आघाडीकडून उद्धवसेनेचे काही नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर संदेश पारकर यांची पुढील राजकीय वाटचाल कशी असेल याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.