शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत जास्मिन लांबोरियाची 'सुवर्ण' कामगिरी!
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

कन्हैयाचे गारुड !

By admin | Updated: April 26, 2016 05:32 IST

कन्हैया कुमारला भाजपा उगाचच मोठे करीत आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करायला हवे होते, असे सर्वसाधारणत: म्हटले जात आले आहे.

कन्हैया कुमारला भाजपा उगाचच मोठे करीत आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करायला हवे होते, असे सर्वसाधारणत: म्हटले जात आले आहे. कन्हैया कुमार मुंबई-पुणे येथे येऊन सभा घेऊन गेल्यावरही याच मतप्रदर्शनाचा पुनरुच्चार केला जात आहे. हे मत खरेच आहे. पण हे केवळ अर्धसत्य आहे. कन्हैया कुमार जे काही बोलत आहे, जे काही सांगू पाहत आहे, त्यासाठी तो जी संवादाची पद्धत अवलंबत आहे, ती मोदी यांच्यासारखीच आहे. कन्हैया कुमार याला जो काही प्रतिसाद मिळत आहे, त्याचे कारण या तरुणाची संवाद साधण्याची कला आणि ती वापरून हजरजबाबीपणे मुद्दे मांडण्याची त्याची हातोटी. मोदी यांनी २०१४च्या लोकसभा निवडणुकीत याच पद्धतीने प्रसारमाध्यमांच्या प्रभावाला आपल्या साध्या सोप्या भाषेत हजरजबाबी पद्धतीने मतदारांशी संवाद साधण्याच्या कलेची जोड दिली होती. उदाहरणार्थ, काँगे्रसच्या अधिवेशनात त्या पक्षाचे एक तोंडाळ नेते मणीशंकर अय्यर यांनी मोदी यांची ‘चहावाला’ म्हणून संभावना केली होती. मोदी यांनी लगेच हाच मुद्दा उचलून अशा कौशल्याने तो जनतेपुढे मांडला की, काँगे्रसची कोंडी झाली. पुढे निवडणूक प्रचाराच्या सभांत हाच मुद्दा मोदी यांनी अनेकदा उगाळला. त्यामुळे काँगे्रसचा जनहिताशी कसा संबंध उरलेला नाही, हे दाखवून देण्यात मोदी यशस्वी होत गेले. तसे बघायला गेल्यास मोदी यांच्याकडे तेव्हा आणि आजही काँगे्रसपेक्षा वेगळी काहीच धोरणात्मक चौकट नव्हती. पण माहिती तंत्रज्ञानाच्या अफाट शक्यतांची चांगली जाणीव आणि त्याच्या आधारे संवाद साधण्याची कसोशीने आत्मसात केलेली कला यांच्या जोरावर मोदी यांचे गारुड जनमनावर पसरले. मोदी सरकार सत्तेवर येण्याचे हे खरे कारण होते. प्रत्यक्षात मोदी यांनी जे काही सांगितले वा जी काही आश्वासने दिली, त्यापैकी असंख्य अंमलात येणे अशक्यच होते. म्हणूनच या संबंधात जेव्हा प्रश्न विचारले जाऊ लागले, तेव्हा मग भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी ‘चुनावी जुमला’ ही संकल्पना पुढे आणली. ‘निवडणुकीपुरती ही अशी आश्वासने द्यायचीच असतात, ती प्रत्यक्षात कधीच येणार नसतात’, असा या ‘चुनावी जुमला’चा अर्थ होता. थोडक्यात ‘आम्ही जनतेला फसवले, ती फसली’ असेच खरे तर शहा यांना म्हणायचे होते. मोदी सरकार व आधीची संयुक्त पुरोगामी आघाडीची राजवट यांच्यात धोरणात्मकदृष्ट्या फारसा काहीच फरक नसल्याने जनतेचा जो भ्रमनिरास होऊ लागला आहे, त्याकडे काँगे्रससह इतर राजकीय पक्ष बोट दाखवू लागले आहेत. पण या पक्षाच्या हाती सत्ता असताना त्यांनी याच पद्धतीने कारभार केला असल्याने, ‘तुमच्या कारकिर्र्दीत काय झाले होते?’ असा प्रतिप्रश्न विचारून भाजपा गेले वर्षभर राजकीय चर्चाविश्वात कुरघोडी करू पाहत आला आहे. त्यातच संवाद कौशल्य व हजरजबाबीपणा इतर पक्षांच्या नेत्यांकडे लालूप्रसाद यांच्यासारखा एखादाच अपवाद; पण त्याची परिणामकारकता उत्तर भारतातील ग्रामीण भागांपुरतीच मर्यादित आहे. तो फारसा नसल्याने आजही मोदी यांचे गारुड निदान शहरी भागात तरी कायम आहे. कन्हैया कुमार नेमके हेच ‘मोदी तंत्र’ वापरत आहे. त्याच्याकडेही उत्तम संवाद कौशल्य आहे. तोही हजरजबाबी आहे. मोदी यांनी जी आश्वासने दिली होती, ती कशी पोकळ होती, हे तो परिणामकारकरीत्या मांडत आहे. भाजपा व मोदी यांना नेमके हेच खुपत आहे. मुंबईतील सभेत बोलताना हा तरुण विद्यार्र्थी नेता म्हणाला की, ‘प्रचंड उन्हात पाण्यासाठी फेऱ्या माराव्या लागल्यामुळे एका शाळकरी मुलीचा उष्माघाताने मृत्यू झाला, तेव्हा मोदी आपला मेणाचा पुतळा न्याहाळताना छायाचित्रे प्रसिद्ध होत होती, इतक्या उन्हात मोदी यांनी जाऊन दाखवावे, मग पाहा, मेणाचा पुतळा तर वितळेलच; पण त्यांचीही काय अवस्था होते ती. वास्को द गामाप्रमाणे जगाचा प्रवास करणारे मोदी दुष्काळात होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्यासाठी मराठवाड्यात का गेले नाहीत?’ अशा तऱ्हेने परखड वास्तवावर बोट ठेवण्याचे कौशल्य कन्हैया कुमार याच्याकडे असल्यानेच त्याला जनतेतून प्रतिसाद मिळत आहे. हे वास्तव दाखवून देण्यापलीकडे त्याच्याकडे सांगण्यासारखे फारसे काही नाही, हे तर खरेच आहे. पण ‘आपले दु:ख जाणून घेणारा हा तरुण आहे’, एवढी भावना त्याला ऐकणाऱ्या श्रोत्यांच्या मनात घर करून राहण्याएवढे संवाद कौशल्य कन्हैयाकडे आहे. त्याचे गारुड पसरत आहे, ते त्यामुळेच. आपल्याला कोणी तरी शेरास सव्वाशेर भेटला आहे, याची मनोमन जाणीव भाजपाला झाली आहे. आपल्या आश्वासनातील पोकळता प्रभावीपणे अशीच दाखवून दिली जात राहिली तर विरोधी माहोल आकाराला येऊ शकतो आणि त्याचा फायदा मतांच्या हिशेबात आपल्या विरोधातील पक्षांना उठवता येईल, याची प्रखर जाणीव भाजपाला आहे. त्यामुळेच कन्हैयाला बदनाम करण्याचे, त्याच्या सभांना आडकाठी करण्याचे, त्याच्यावर टीकेची झोड उठविण्याचे धोरण भाजपा अवलंबत आहे; कारण कन्हैयाचे गारूड पसरत जाईल, तशी मोदी लाटेची ओहोटी अधिकच वाढेल, हे भाजपा जाणून आहे. म्हणूनच मोदी व भाजपा यांना कन्हैयाकडे दुर्लक्ष करणे अशक्य झाले आहे.