अटल सेतूवरून ‘शिवनेरी’चा प्रवास, प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद; एसटीला 15 कोटींचा महसूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 06:00 IST2024-11-26T05:59:34+5:302024-11-26T06:00:08+5:30
आतापर्यंत ३२ हजार ६१८ जणांनी केला प्रवास, दादर-स्वारगेट मार्गावर १० मे ते २२ नोव्हेंबरदरम्यान, तर दादर-चिंचवड मार्गावर १० मे ते १ सप्टेंबरपर्यंत ही सेवा कार्यरत होती.

अटल सेतूवरून ‘शिवनेरी’चा प्रवास, प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद; एसटीला 15 कोटींचा महसूल
मुंबई - राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) अटल सेतूमार्गे दादर ते स्वारगेट आणि दादर ते चिंचवड या मार्गांवर सुरू असलेल्या शिवनेरी बससेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळला आहे. या मार्गांवरून ई-शिवनेरी सेवेला १० मे २०२४ पासून सुरुवात झाल्यानंतर आतापर्यंत ३२ हजार ६१८ जणांनी प्रवास केला.
दादर-स्वारगेट मार्गावर १० मे ते २२ नोव्हेंबरदरम्यान, तर दादर-चिंचवड मार्गावर १० मे ते १ सप्टेंबरपर्यंत ही सेवा कार्यरत होती. या कालावधीत एसटी महामंडळाने १४ कोटी ७७ लाख ४०० रुपयांचा महसूल मिळवला आहे. प्रवाशांच्या मागणीला प्रतिसाद देत महामंडळाने ही सेवा अटल सेतूवरून सुरू केली होती. ई-शिवनेरी सेवा उच्च दर्जाची, आरामदायी आणि वेळेवर पोहोचणारी असल्यामुळे प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी महामंडळाला अपेक्षा होती. सुरुवातीला या बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद दिसत असला तरी आता मात्र प्रवासी संख्येचा उतरता आलेख पाहायला मिळत आहे. मे आणि जून महिन्यांमध्ये दादर स्वारगेट मार्गावर प्रवासी संख्या चांगली असली तरी ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये ती कमी झाल्याचे दिसते.
दादर-चिंचवड ई-शिवनेरी सेवा बंद
दादरवरून पुणे-चिंचवड अप आणि डाउन मार्गावरील शिवनेरी सेवा सप्टेंबर महिन्यापासून बंद करण्यात आली. या मार्गावर प्रवासी संख्या घटल्याने महामंडळाने ही सेवा बंद केली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या महिन्यात या मार्गावर २४०० प्रवाशांनी प्रवास केला, तर ऑगस्ट महिन्यामध्ये या मार्गावर केवळ ६५० प्रवाशांनी प्रवास केला. त्यामुळे या मार्गावरील सेवा बंद करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.