Jitendra Awhad : 'राज्यात स्थगिती सरकार आलंय, पण फडणवीसांचे आभार', जितेंद्र आव्हाडांची खोचक टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2022 20:15 IST2022-10-11T20:14:22+5:302022-10-11T20:15:19+5:30
जितेंद्र आव्हाड यांना लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयरचा मोस्ट इम्पॅक्टफुल पॉलिटिशियन हा पुरस्कार देण्यात आला.

Jitendra Awhad : 'राज्यात स्थगिती सरकार आलंय, पण फडणवीसांचे आभार', जितेंद्र आव्हाडांची खोचक टीका
मुंबई: महाराष्ट्राच्या भूमीशी ज्यांनी रक्ताचे आणि घामाचे नाते जोडले, ज्यांनी आपले आयुष्य इथल्या समृद्धीसाठी वेचले अशा महाराष्ट्रीयांची दखल घेत 'लोकमत'ने सुरू केलेला सन्मान म्हणजे, 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार. लोकसेवा, समाजसेवा, शिक्षण, प्रशासन, राजकारण, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दरवर्षी या पुरस्कारानं गौरवण्यात येते. या सोहळ्यात राजकारणातील कामगारीबद्दल राष्ट्रवादी काँग्रसे नेते जितेंद्र आव्हाड यांना विशेष पुरस्कार देण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी जितेंद्र आव्हाडांना 'मोस्ट इम्पॅक्टफूल पॉलिटीशन ऑफ द इअर' हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना आव्हाडांनी विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारवर खोचक टीका केली. जितेंद्र आव्हाड यांनी आपला पुरस्कार शरद पवार, गृहनिर्माण खाते आणि सर्व कर्मचाऱ्यांना समर्पित केला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांना उद्देशून एका बैठकीचाही उल्लेख केला.
आव्हाडांची कोपरखळी
यावेळी आव्हाड म्हणाले की, 'महाविकास आघाडी सरकारमध्ये माझ्याकडे गृहनिर्माण खाते होते. पण, आता गृहनिर्माण खाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले आहे. मागच्या आठवड्यातच माझी विद्यमान गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत म्हाडाच्या कामाबाबत बैठक झाली. सध्या राज्यात स्थगिती सरकार आले आहे, पण फडणवीसांनी माझ्या 52 प्रकल्पांपैकी एकाही प्रकल्पाला स्थगिती दिली नाही, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो,' अशी टीका आव्हाडांनी केली.