‘माफी’वरून जितेंद्र आव्हाड-सुरेश धस यांच्यात जुंपली; सोमनाथ सूर्यवंशींची आई संतापली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 06:12 IST2025-02-11T06:12:09+5:302025-02-11T06:12:37+5:30
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातील दोषी पोलिसांना माफ करा, असे म्हणणारे आमदार सुरेश धस यांनी आपले कुटुंब दोन दिवस पोलिसांच्या ताब्यात द्यावे. तेव्हा, त्यांना मुलाच्या मृत्यूचे महत्त्व कळेल, अशी संतापजनक भावना विजयाबाई सूर्यवंशी यांनी दिली.

‘माफी’वरून जितेंद्र आव्हाड-सुरेश धस यांच्यात जुंपली; सोमनाथ सूर्यवंशींची आई संतापली
मुंबई : परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणावरून शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्यात शाब्दिक चकमक झडली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या एका ट्विटमध्ये, परभणी प्रकरणात पोलिसांवर गुन्हे दाखल व्हावेत हा आग्रह धरू नका, असे सुरेश धस एका व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत. तर काही गोष्टींमध्ये मोठ्या मनाने माफ करायचे असते, असंही धस आव्हाडांनी ट्विट केलेल्या व्हिडिओत म्हणत आहेत. ‘मग याच न्यायाने वाल्मिक कराडलाही माफ करायचं का?’, असा सवाल आव्हाड यांनी केला.
त्याला प्रत्युत्तर देताना धस यांनी निशाणा साधला. आव्हाडसारख्या राष्ट्रीय संतांनी अपुऱ्या माहितीवर बोलावे, यापेक्षा मोठे दुर्दैव नाही. मोडून तोडून तेवढीच क्लिप काढली गेली. मी कुणाला माफ करा बोललो? जे कुठेच रेकॉर्डवर नाहीत त्यांना निलंबित करायचे म्हटले तर पोलीस दलाच्या मनोबलावर परिणाम होईल, असे वक्तव्य मी केले होते. तेच वक्तव्य आजही मी करतो.
दरम्यान सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातील दोषी पोलिसांना माफ करा, असे म्हणणारे आमदार सुरेश धस यांनी आपले कुटुंब दोन दिवस पोलिसांच्या ताब्यात द्यावे. तेव्हा, त्यांना मुलाच्या मृत्यूचे महत्त्व कळेल, अशी संतापजनक भावना विजयाबाई सूर्यवंशी यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाहीत. आम्ही दगडे फोडणारी माणसे आहोत. आमचे मन लहान आहे. त्यामुळे आम्ही दोषींना माफ करणार नाही, असेही मयत सोमनाथ यांच्या आई विजयाबाई म्हणाल्या.