- संजीव वेलणकर
जन्म. 21 ऑगस्ट 1926
संगीताची तालीम मा.जयमाला शिलेदार यांनी गोविंदराव टेंबे यांच्याकडून घेतली. टेंबे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘वेषांतर’ या नाटकामधून शिलेदार यांनी रंगभूमीवर पदार्पण केलं आणि त्यानंतर आपल्या अभिनय आणि गायनानं रंगभूमी गाजवून सोडली. प्रमिला जाधव हे त्यांचं माहेरचं नाव. ‘शाकुंतल’ नाटकामध्ये त्यांनी जयराम शिलेदार यांच्याबरोबर काम केलं आणि त्यानंतर हे दोघं विवाहबद्ध झाले. विवाहानंतर या दोघांनीही आपल्याला संगीत रंगभूमीसाठी वाहून घेतलं. या दोघांनी ‘मराठी रंगभूमी’ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेतर्फे त्यांनी ‘मुंबईची माणसे’, ‘एखाद्याचं नशीब’, ‘मला निवडून द्या’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘राम जोशी’ आदी नाटकांची निर्मिती केली.
नाटकांच्या निर्मितीबरोबरच जयमाला शिलेदार यांनी त्या काळातील बहुतेक सर्व गाजलेल्या संगीत नाटकांमध्ये काम केलं. ‘सौभद्र’, ‘सुवर्णतुला’, ‘संशयकल्लोळ’, ‘स्वयंवर’, ‘एकच प्याला’, ‘शाकुंतल’, ‘मृच्छकटिक’ आदी नाटके त्यांनी गाजविली होती. रसिकांच्या प्रेमाबरोबरच विविध पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला होता. बालगंधर्वांच्या चाहत्या असणार्या जयमालाबाईंना त्यांच्या नावाचा पुरस्कार तब्बल तीन वेळा मिळाला होता. २००६ मध्ये त्यांना लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. मा. जयमाला शिलेदार यांचे ८ ऑगस्ट २०१३ राेजी निधन झाले.