महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये सभागृहात होणारी जुगलबंदी आपण अनेकदा पाहिली आहेच. विरोधकांच्या अडचणीत आणणाऱ्या अनेक प्रश्नांना देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या वाक्-चातुर्याने उत्तर देत असतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षातील एका ज्येष्ठ आणि मुरब्बी नेत्याची अशी जुगलबंदी आज 'लोकमत'च्या महासोहळ्यात रंगणार आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील घेणार आहेत. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' या प्रतिष्ठेच्या पुरस्कार सोहळ्यात ही महामुलाखत होणार आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळातील दोन कसलेले नेते या मुलाखतीच्या निमित्ताने समोरा-समोर येणार असल्याने ही मुलाखत या पुरस्कार सोहळ्याचं खास आकर्षण ठरणार आहे.
गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. मात्र, मुख्यमंत्रिपदाच्या या तिसऱ्या कारकिर्दीच्या सुरुवातीचा देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर अनेक आव्हानं उभी आहेत. एकीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली अस्थिरता नियंत्रणात आणण्यासोबतच, निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचं मोठं आव्हान देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आहे. त्यासोबतच राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सोडवतानाही त्यांचा कस लागतोय.
त्या पार्श्वभूमीवर, विधिमंडळात सत्ताधाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करून त्यांना भंडावून सोडणारे जयंत पाटील 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'च्या मंचावरून मुख्यमंत्र्यांना कोणत्या प्रश्नांचे 'बाऊन्सर' टाकतात आणि देवेंद्र फडणवीस कशी बॅटिंग करतात, हे पाहणं रंजक असेल.
दरम्यान, महाराष्ट्रातील सर्वात मोठा अन् मानाचा समजला जाणारा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार सोहळा आज मुंबईतील राजभवन येथे होणार आहे. लोकसेवा/समाजसेवा, कृषी, शिक्षण, क्रीडा, प्रशासन, वैद्यकीय, उद्योग, स्टार्ट अप या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मंडळींना या सोहळ्यात 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.