जवखेडे हत्याकांड ; नातेवाईकच खुनी
By Admin | Updated: March 15, 2015 01:26 IST2015-03-15T01:26:49+5:302015-03-15T01:26:49+5:30
जवखेडे हत्याकांडातील आरोपींच्या रक्ताचा ‘डीएनए’ अहवाल अहमदाबाद फॉरेन्सिक लॅबकडून पोलिसांना प्राप्त झाला आहे.

जवखेडे हत्याकांड ; नातेवाईकच खुनी
अहमदनगर : जवखेडे हत्याकांडातील आरोपींच्या रक्ताचा ‘डीएनए’ अहवाल अहमदाबाद फॉरेन्सिक लॅबकडून पोलिसांना प्राप्त झाला आहे. त्यात मृतांचे नातेवाईक असलेले व अटक केलेल्या जाधव कुटुंबातील बाप व दोघे लेकच खुनी असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे.
‘अॅनाटॉमी’ तपासणीचा अहवाल मिळाल्यानंतर तपासाला पूर्णविराम मिळणार आहे. पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील दलित कुटुंबातील तिहेरी हत्याकांडप्रकरणी आरोपी प्रशांत त्यांचा मुलगा अशोक आणि दिलीप सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. नार्को चाचणीच्या अहवालात हे तिघेच खुनी असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर झाल्यानंतर पुराव्यांमध्ये कोणतीही त्रुटी राहणार नाही, यासाठी तिन्ही आरोपींच्या रक्ताचे नमुुने अहमदाबाद येथील फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात आले होते. तेथे डीएनए चाचणी करण्यात आली. डीएनए अहवालामुळे तिघांनीच खून केल्याचा आणखी एक सबळ पुरावा उपलब्ध झाल्याची माहिती तपास अधिकारी शशिराज पाटोळे यांनी दिली. तिघांची हत्या झाल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करण्यात आले होते. त्याची अॅनाटॉमी चाचणी घेण्यात आली होती. (प्रतिनिधी)
हत्याकांडाचे दोषारोपपत्र जिल्हा न्यायालयात सादर करण्यात आले आहे. अत्यंत गुंतागुंतीचा आणि वैज्ञानिक चाचण्यांवर आधारीत खटला चालविण्यासाठी सध्या कार्यरत असलेल्या सरकारी वकिलांपैकी एकही कार्यक्षम नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यासाठी पोलिसांचा पाठपुरावा सुरू आहे.