श्रवणबेळगोळ येथील बाहुबलीच्या मूर्तीवर जलाभिषेक, मुख्य सोहळ्यासाठी उत्सुकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 17:52 IST2018-02-17T16:53:14+5:302018-02-17T17:52:38+5:30
कर्नाटकातल्या श्रवणबेळगोळ शहरातील काही शतकं जुन्या कोरीव दगडी मूर्तीवर अभिषेकासोबत पवित्र मंत्रांच्या उच्चरवातील पवित्र वातावरणात गोमटेश्वर बाहुबलीच्या अतिभव्य मूर्तीवर जलाभिषेक सोहळा शनिवारी संपन्न झाला.

श्रवणबेळगोळ येथील बाहुबलीच्या मूर्तीवर जलाभिषेक, मुख्य सोहळ्यासाठी उत्सुकता
भरत शास्त्री
श्रवणबेळगोळ (जि. हसन, कर्नाटक) : कर्नाटकातल्या श्रवणबेळगोळ शहरातील काही शतकं जुन्या कोरीव दगडी मूर्तीवर अभिषेकासोबत पवित्र मंत्रांच्या उच्चरवातील पवित्र वातावरणात गोमटेश्वर बाहुबलीच्या अतिभव्य मूर्तीवर जलाभिषेक सोहळा शनिवारी संपन्न झाला.
या शतकातील दुसरा आणि स्थापनेपासूनचा ८८ वा महामस्तकाभिषेक सोहळ्यातील हा पहिला जलाभिषेक होता. दुपारी सुरु होणार असलेल्या मुख्य अभिषेक सोहळ्याला विलंब झाला असून या सोहळ्यासाठी सर्व भाविक उत्सुक आहेत.
गोमटेश, गोमटेश, जय गोमटेशच्या गजरात सकाळच्या सत्रात भगवान बाहुबलीच्या मस्तकावर १0८ श्रावक-श्राविकांच्या हस्ते जलाभिषेक करण्यात आले. या सोहळ्याला सकाळीच प्रारंभ झाला. हा सोहळा सायंकाळपर्यंत सुरुच होता.
या महामस्तकाभिषेक सोहळ्याचा पहिला मान राजस्थानातील किशनगडचे आर. के. मार्बलचे अशोक पाटणी यांना मिळाला आहे. त्यांच्या उपस्थितीत कलश पूजन सोहळा पार पडला. या समारंभात त्यांनी श्रवणबेळगोळ येथे २00 खाटांचे सर्वसोयीनीयुक्त रुग्णालय बांधून देण्याची घोषणा केली. यावेळी कर्मयोगी चारुकीर्ती भट्टारक महास्वामी, पूज्य १0८ वर्धमान सागर महाराज, पूज्य १0८ पुष्पदंत सागर महाराज आदी उपस्थित होते.
दर बारा वर्षांनी होणाऱ्या या सोहळ्यासाठी देशभरातून अनेक भाविक आधीच श्रवणबेळगोळ येथे दाखल झाले आहेत. मुख्य सोहळ्यासाठी अभिषेकाचे द्रव्य आणि सामग्री विंध्यगिरी पहाडावर पोहोचविण्यात आल्यानंतर मूर्तीसमोर विधी व विधान सुरु होते. मुख्य पहाडावर मर्यादित भाविकांनाच परवानगरी असल्यामुळे पहाटेपासूनच चंद्रगिरी पहाडावर सर्व भाविकांनी गर्दी केली आहे. हातामध्ये पंचरंगी ध्वज घेतलेले हजारो भाविक या पहाडावर उपस्थित आहेत.
यावेळी भगवान बाहुबलीच्या महामुर्तीवर प्रारंभी १0८ पवित्र कलशांनी जलाभिषेक करण्यात आले. त्यानंतर पंचामृत अभिषेक संपन्न झाला. या मध्ये नारळ पाणी, ऊसाचा रस, दूध, तांदळाचे चूर्ण, हळद, कषाय चूर्ण, एक ते चार कलश, म्हैसूर चंदन, कृष्ण चंदन, अन्य ८ प्रकारचे चंदन, केशर, चांदीची फुले, सोन्याची फुले, पुष्प वृष्टी आणि मुख्य कलशातून अभिषेक करण्यात येणार आहे.
१२ वर्षातून होणाऱ्या या महामास्तकाभिषेकाचा पहिला मान मिळालेल्या अशोक पाटणी (किशनगड, राजस्थान) यांच्यासमवेत त्यांचे कुटूंबिय विमल पाटणी, सुरेश पाटणी, भवरलाल पाटणी आदीनी अभिषेक करून या महामस्तकाभिषेक सोहळ्यास प्रारंभ केला.
यावेळी कर्मयोगी जगद्गुरू भट्टारक चारुकीर्ती महास्वामी उपस्थित होते. त्यांनी बृहददान केल्याबद्दल अशोक पाटणी यांचे आभार मानले. अभिषेकापूर्वी पूज्य १0८ आचार्य वर्धमानसागर महाराज, पूज्य १0८ आचार्य पुष्पदंत सागर महाराज आणि महोत्सवासाठी आलेले सर्व मुनिराज व अर्यिका यांची उपस्थिती होती. त्यांच्यासोबत महोत्सवाचे अर्ध्वयु वीरेंद्र हेगडे उपस्थित होते.
सर्वप्रथम भट्टारक स्वामी, १0८ आचार्य वर्धमानसागर महाराज, १0८ आचार्य पुष्पदंत सागर महाराज आणि अन्य मुनिराजांनी विधी विधान सम्पन्न केले. महामस्तकाभिषेकापूर्वी महामूर्तीवर विविध द्रव्यांचा कोणताही परिणाम होऊ नये त्यासाठी विशिष्ट प्रकारचा लेप लावण्यात आला.
तत्पूर्वी सर्वप्रथम महामुर्तीच्या चरणांची पूजा करण्यात आली. त्याच वेळी अभिषेक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कलशांचेही पूजन करण्यात आले. यामध्ये रजत कलश व सुवर्ण कलशांचा समावेश होता. सुरवातीला १0८ कलशानी अभिषेक करण्यात आले, त्यानंतर १00८ कलशानी पंचामृत अभिषेक करण्यात आले.
जलाभिषेकासाठी गंगा, यमुना आणि सिंधू यासह देशातील मुख्य १0 नद्यांमधून जल आणण्यात आले होते. यावेळी जैन धमार्तील दिंगम्बर, श्वेतांबर, स्थानकवासी असे सर्व पंथातील श्रावक-श्राविका उपस्थित होते. संपूर्ण महामास्तकाभिषेकावेळी सांगली येथील सोनाली देसाई यांच्या मधुर आवाजातील धार्मिक भाजनांनी रंगत आणली होती. अभिषेकासाठी पहाडावर विशेष पास देण्यात आले होते. अगदी मर्यादित भाविकांना भगवान गोमटेश्वर बाहुबली यांच्या महामुर्तीजवळ तयार करण्यात आलेल्या विशेष व्यासपीठाजवळ पाठविण्यात आले.