It will take time to get out of the flooded state, election will push some time | पूरग्रस्त स्थितीतून बाहेर यायला वेळ लागेल, भंपकपणा सोडून निवडणूका पुढे ढकला : ना. धों. महानोर
पूरग्रस्त स्थितीतून बाहेर यायला वेळ लागेल, भंपकपणा सोडून निवडणूका पुढे ढकला : ना. धों. महानोर

ठळक मुद्देनारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार प्रदान‘चार कविता कमी लिहिल्या तरी चालेल, पण सुर्वेसारखे जगण्याचा प्रयत्न करेन.

पुणे : पूरग्रस्त परिस्थितीतून बाहेर पडून सगळे नव्याने उभे करायला किमान पाच-सहा वर्षे लागतील. अशावेळी भंपकपणा करून उपयोग नाही. कोटींचे आकडे बाजूला ठेवून प्रत्यक्ष काम करावे लागणार आहे. सध्या सत्ता तुमचीच आहे. मग, निवडणूक पुढे ढकलली तर कोणाचे काय जाणार आहे, असा सवाल उपस्थित करत ज्येष्ठ कवी ना.धों.महानोर यांनी सरकारवर निशाणा साधला. निवडणुकीची आचारसंहिता लागली की कामात अडचणी येतात. त्यामुळे निवडणुका किमान दोन-तीन महिने पुढे ढकला, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 
महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे आयोजित कार्यक्रमात रविवारी एस.एम.जोशी सभागृह येथे ज्येष्ठ कवी ना.धों. महानोर यांना नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. कविवर्य पद्मश्री नारायण सुर्वे स्मृतीदिन समारंभ आणि पुरस्कार प्रदान सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर तर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले उपस्थित होते.
निवृत्त सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांना नारायण सुर्वे भला माणूस पुरस्कार, ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांना नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार, अखिल भारतीय मराठी नाटय परिषद पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांना नारायण सुर्वे स्नेहबंध पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव, तसेच सूर्यदत्ता ग्रूप ऑफ इन्स्टिटयूटचे डॉ. संजय चोरडिया यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
महानोर म्हणाले, ‘चार कविता कमी लिहिल्या तरी चालेल, पण सुर्वेसारखे जगण्याचा प्रयत्न करेन. १९५६ संयुक्त महाराष्ट्राची निवडणुकीच्या दरम्यान शाहीर अमर शेख यांच्या माध्यमातून मला नारायण सुर्वे पहिल्यांदा भेटले. त्या निवडणुकीतील एक पान अमर शेख आणि नारायण सुर्वे यांचे आहे. सुर्वेंनी जगण्याचा, रोजीरोटीचा प्रश्न कवितेतून मांडला. घाम गाळणा-या दु:खी माणसाचा हुंकार त्यांनी ठोसपणे पहिल्यांदा मांडला.’ 
उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. सचिन इटकर यांनी प्रास्ताविक केले. 
--------------
काय म्हणाले महानोर?
- १९५६ च्या संयुक्त महाराष्ट्राच्या निवणुकीमध्ये सभा, संमेलने रंगत होती, दिग्गजांची उपस्थिती असायची. एका सभेला जवाहरलाल नेहरु स्वत: उपस्थित होते. त्यांनी रशिया, चीनसंबंधी आंतरराष्ट्रीय प्रश्न, भाक्रानांगल याबाबत भाष्य केले. त्यावेळी समाजवादी पक्षातर्फे कोणी निवडणूक लढवायला तयार नव्हते. एका तरुणाला काँग्रेसविरोधात उभे करण्यात आले. शाहीर अमर शेख यांनी सुर्वेंच्या कवितेच्या माध्यमातून निवडणुकीच्या प्रचारात वास्तव मांडले. त्यावेळी भाकरी महत्वाची की भाक्रानांगल, असा सवाल उपस्थित करण्यात आला.
- मला उजवा-डावा असा भेद समजतच नाही. तुकारामालाही त्यातील काही समजत नव्हते. त्यांनी केवळ प्रेमाची शिकवण दिली. समाजाच्या भल्याचा विचार केला. डावे-उजवे असे मतभेद नक्की असतील. पण देशात इतिहास घडवणारा माणूस म्हणून नेहरुंचा मोठेपणा विसरता येणार नाही. राजकारणात तारतम्य बाळगून कसे चालले पाहिजे, हे त्या काळातील लोकांकडून आजच्या राजकारण्यांनी समजून घेतले पाहिज.े
- भ्रष्टाचार ना करेंगे, ना करने देंगे हे कोणत्या आत्मविश्वासाने बोलले जाते? महाराष्ट्र आणि देशात अजूनही भ्रष्टाचार राजरोसपणे सुरू आहे.
- काँग्रेसच्या विरोधात उभे राहायला तेव्हा माणसेच मिळत नव्हती. परिस्थिती कशी बदलते, ते आता कळते आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
- राजकारण्यांना लाजवेल असे राजकारण आमचे साहित्यिक करतात. निवडणुकीत एकगठ्ठा मते, मतांची पळवापळवी हे लाजिरवाणे होते. कविता, साहित्यासाठी आयुष्य वेचलेले दिग्गजही संमेलनाध्यक्षाच्या निवडणुकीत पडले. यातून काय साध्य झाले? साहित्य संमेलनाबद्दल न बोललेलेच बरे.


Web Title: It will take time to get out of the flooded state, election will push some time
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.