दुसरी जागा जिंकण्यासाठी दहा मतं लागणार, काँग्रेस कुठून आणणार? असं आहे समीकरण   

By यदू जोशी | Published: June 14, 2022 02:05 PM2022-06-14T14:05:47+5:302022-06-14T14:06:38+5:30

Vidhan Parishad Election 2022: २० जूनला होणाऱ्या  विधान परिषदेच्या १० जागांसाठीच्या निवडणुकीत भाजपचे  प्रसाद लाड विरुद्ध काँग्रेसचे  भाई जगताप यांच्यात दहाव्या जागेसाठीचे घमासान होऊ घातले आहे. दोन मुंबईकर धनवंत नेत्यांमध्ये बाजी कोण मारणार या बाबत उत्सुकता असेल.

It will take ten votes to win the second seat, where will the Congress come from? That's the equation | दुसरी जागा जिंकण्यासाठी दहा मतं लागणार, काँग्रेस कुठून आणणार? असं आहे समीकरण   

दुसरी जागा जिंकण्यासाठी दहा मतं लागणार, काँग्रेस कुठून आणणार? असं आहे समीकरण   

googlenewsNext

- यदू जोशी
मुंबई -  राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे संजय पवार विरुद्ध भाजपचे धनंजय महाडिक असा सहाव्या जागेचा सामना रंगला अन् महाडिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कौशल्याच्या आधारे बाजी मारली. २० जूनला होणाऱ्या  विधान परिषदेच्या १० जागांसाठीच्या निवडणुकीत भाजपचे  प्रसाद लाड विरुद्ध काँग्रेसचे  भाई जगताप यांच्यात दहाव्या जागेसाठीचे घमासान होऊ घातले आहे. दोन मुंबईकर धनवंत नेत्यांमध्ये बाजी कोण मारणार या बाबत उत्सुकता असेल.

राज्यसभेच्या निवडणुकीत एमआयएमने काँग्रेसचे इम्रान प्रतापगडी यांना पाठिंबा जाहीर केला होता, पण  प्रत्यक्ष मतदान त्यांना केले की नाही हे समोर येऊ शकले नाही. काँग्रसचे नेते सांगत आहेत की त्यांच्याकडे स्वत:ची ४४ मते होती. एमआयएमने दोन मते काँग्रेसला दिली, त्यामुळे काँग्रेसने दोन मते ही शिवसेनेचे संजय पवार यांच्याकडे वळविली. अर्थात हे सगळे दावे आहेत आणि त्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही. प्रतापगडी यांच्यावेळी एकच जागा काँग्रेसला निवडून आणायची होती. पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा ४१ होता. प्रतापगडी यांना ४४ मते मिळाली. काँग्रेसला जिंकण्यासाठी फारशी मेहनत घ्यावी लागली नाही.

प्रतापगडी हे मुस्लिम असल्याने की काय पण एमआयएमने त्यांना पाठिंबा जाहीर केला होता, पण यावेळी काँग्रेसच्या बाबतीत तसे काही कारण नाही की एमआयएम त्यांना पाठिंबा देईल. काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप हे आहेत. त्यामुळे यावेळी एमआयएम काँग्रेसला पाठिंबा देईल का हा  प्रश्न आहे. काँग्रेसचे ४४ आमदार आहेत. विधान परिषदेच्या एका जागेचा कोटा २७ आहे. याचा अर्थ दोन जागा निवडून आणण्यासाठी काँग्रेसला दहा मतांची गरज आहे. अपक्ष आमदार हे शिवसेना, भाजप व राष्ट्रवादीचे सहयोगी सदस्य आहेत, त्यामुळे त्यांच्यापैकी कोणी काँग्रेसला मत देण्याची शक्यता नाही. शिवसेनेच्या दोन जागा आरामात निवडून येवू शकतात. कारण त्यांचे ५५ आमदार आहेत आणि दोन जागा निवडून आणण्यासाठी त्यांना ५४ मते हवी आहेत. शिवसेनेकडे सात अपक्ष आहेत. असे मिळून त्यांची ६१ मते होतात. त्यापैकी जास्तीची सात मते ते काँग्रेसकडे वळवतील का? आपल्या स्वत:च्या दोन उमेदवारांना ५४ इतक्या काठावरची मते शिवसेना घेईल की जास्तीच्या तीनचार  मतांची तजवीज करेल? अशी तजवीज शिवसेनेने केली तर काँग्रेसला फटका बसेल.

राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेला दोन मित्रपक्ष, अपक्ष व लहान पक्षांच्या मतांची गरज होती. यावेळी ती गरज काँग्रेसला असेल. मतांसाठी पायपीट करण्याची वेळ काँग्रेसवर आहे. शिवसेनेला राज्यसभेसाठी मते हवी होती तेव्हा खुले मतदान होते, यावेळी तर गुप्त मतदान आहे. त्यामुळे काँग्रेसची कसोटी शिवसेनेपेक्षा अधिक लागणार आहे.

भाई जगताप हे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचे निवडून येणे काँग्रेससाठी अतिशय  प्रतिष्ठेचे असेल. राष्ट्रवादीचे स्वत:चे ५३ आमदार आहेत. अनिल देशमुख आणि नवाब मलिक या दोन माजी-आजी मंत्र्यांना राज्यसभा  निवडणुकीप्रमाणे यावेळीही मतदानाचा अधिकार मिळाला नाही तर त्यांचे ५१ मतदार उरतील. याचा अर्थ दोन जागा निवडून आणण्यासाठी त्यांना आणखी  तीन मतांची गरज असेल. राष्ट्रवादीसाठी ते अजिबात कठीण नाही. त्यामुळे त्यांचे रामराजे नाईक निंबाळकर व एकनाथ खडसे हे दोन उमेदवार निवडून येण्यात अडचण दिसत नाही.

महाविकास आघाडीचा विचार केला तर दुसरी जागा निवडून आणण्यात  प्रचंड कसरत होणार आहे ती काँग्रेसचीच. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण,  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची  प्रतिष्ठा या निमित्ताने पणाला लागली आहे. इम्रान  प्रतापगडी हे पक्षश्रेष्ठींचे उमेदवार होते आणि त्यांना निवडून आणण्यासाठी दिल्लीहून राज्यातील काँग्रेस नेत्यांवर  प्रचंड दबाव होता. तसा दबाव भाई जगताप यांच्यासाठी नसणार. त्यातच मतदान गुप्त असल्याने आपली मतं फुटणार नाहीत याची काळजी काँग्रेसच्या नेत्यांना घ्यावी लागणार आहे. तसेच एकही मत बाद होणार नाही, याचीही दक्षता घ्यावी लागणार आहे. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या पराभवामुळे महाविकास आघाडीतील तीन पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव ठळकपणे समोर आला होता. येत्या चार-सहा दिवसांत समन्वयाची घडी पुन्हा नीट बसविण्याचे आव्हान महाविकास आघाडीसमोर आहेच.
 

Web Title: It will take ten votes to win the second seat, where will the Congress come from? That's the equation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.