बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 15:38 IST2025-09-29T15:38:17+5:302025-09-29T15:38:38+5:30
Ajit Pawar on Golden Man: पुण्यात सोन्याच्या मोठ्या मोठ्या चैनी घालून फिरणाऱ्यांचे गेल्या काही वर्षांपासून पेव फुटले आहे. त्यावर आज अजित पवारांनी भर कार्यक्रमात चांगलेच फटकारले आहे.

बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
अजित पवार आणि त्यांचा फटकळपणा अनेक जणांनी अनुभवला आहे. ज्याचे चुकते त्याला चारचौघात, भर सभेत खडेबोल सुनावायला देखील अजित पवार मागेपुढे पाहत नाहीत. त्याला काय वाटेल, आपल्यापासून दूर जाईल, विरोधकांना जाऊन मिळेल अशा कशाची ते तमा बाळगत नाहीत. पुण्यात सोन्याच्या मोठ्या मोठ्या चैनी घालून फिरणाऱ्यांचे गेल्या काही वर्षांपासून पेव फुटले आहे. त्यावर आज अजित पवारांनी भर कार्यक्रमात चांगलेच फटकारले आहे.
अजित पवार हे चाकणमधील रांका ज्वेलर्सच्या दालनाच्या उद्घाटनासाठी गेले होते. तेव्हा त्यांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमात आता हे अति होत असल्याचे म्हटले आहे. सोने हे पुरुषांना नाही, तर स्त्रियांना शोभून दिसते. त्यामुळे पुरुषांनी सोन्याच्या भानगडीत पडू नका. कसे वाटते ते, बैलाला साखळी घालतात आणि तसेच समोर येतात, अशा शब्दांत अजित पवारांनी या गोल्ड मॅनना फटकारले आहे.
ठीक आहे, हे त्यांच्या पैशाचे आहे. मला त्याबाबत बोलण्याचा अधिकार नाही. पण सोने हा स्रीचा दागिना शोभून दिसतो, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. लहानातल्या लहानापासून मोठ्यापर्यंत सोन्याचे प्रचंड वेड आहे. आता परिस्थिती बदलतेय, खर्च करण्याची क्षमता वाढली आहे. यामुळे अनेक जण सोन्याचे दागिने घेतात. गरजेला त्यावर कर्ज मिळते, असे अजित पवार म्हणाले.