रुग्णालयांनी डिपॉझिट मागणे गैर नाही; पुणे मनपाच्या आदेशाला ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 09:29 IST2025-04-13T09:28:36+5:302025-04-13T09:29:56+5:30
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने एका गर्भवती महिलेच्या प्रसुतीसाठी दहा लाख रुपये अनामत रक्कम जमा करण्यास सांगितले होते. त्यानंतर पुणे महापालिकेने एक मोठा निर्णय घेतला, ज्याला आयएमएने विरोध केला आहे.

रुग्णालयांनी डिपॉझिट मागणे गैर नाही; पुणे मनपाच्या आदेशाला ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चा विरोध
मुंबई : यापुढे पुण्यातील कोणत्याही रुग्णालयाने अनामत रक्कम मागू नये, असा आदेश पुणे महानगरपालिकेने काढला. मात्र, त्याला ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (आयएमए - महाराष्ट्र) विरोध केला आहे. अनामत रकमेची मागणी करणे गैर नाही, अशी भूमिका ‘आयएमए’ने घेतली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अनामत रक्कम न दिल्याने पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गर्भवतीवर उपचार केले नाहीत. त्यामुळे प्रसूतिपश्चात तिचा मृत्यू झाला होता. या घटनेने राज्यात संतापाची लाट उसळली होती.
डॉक्टरांच्या संघटनेने काढलेल्या पत्रकात असेही म्हटले आहे की, धर्मादाय रुग्णलयांना सरकारदरबारी काही सवलती मिळतात. त्यामुळे त्यांनी अनामत रक्कम मागू नये असे सांगणे एकवेळ मान्य करता येईल; पण अनेक लहान आणि मध्यम प्रकारची रुग्णालये आणि धर्मादाय रुग्णालये यामध्ये गल्लत करू नये. सर्वांना एकाच पारड्यात तोलू नये.
डॉक्टरांच्या संघटनेचे म्हणणे काय?
याप्रकरणी आयएमए संघटनेचे अध्यक्ष डॉ. संतोष कदम म्हणाले, ‘रुग्ण जर इमर्जन्सीमध्ये आला तर आम्ही प्रथम त्याची प्रकृती स्थिर होण्यावर लक्ष केंद्रित करतो. त्यावेळी आम्ही अनामत रक्कम मागत नाही. अत्यावश्यक सेवा आम्ही देतोच.’
लहान आणि मध्यम रुग्णालये चालविण्यासाठी दीर्घकालीन आणि वारंवार होणारा खर्च लक्षात घेता अनामत रकमेची मागणी अजिबात गैर नाही, असे आमचे मत आहे. त्यामुळे अमानत रकमेची मागणी करूच नये, असे म्हणणे अन्यायकारक आहे. -डॉ. संतोष कदम, अध्यक्ष, आयएमए