Maratha Reservation: मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणे अशक्य? चंद्रकांत पाटील म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 06:57 IST2025-09-01T06:56:15+5:302025-09-01T06:57:39+5:30
Chandrakant Patil: मराठा आरक्षणाबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपले मत व्यक्त केले.

Maratha Reservation: मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणे अशक्य? चंद्रकांत पाटील म्हणाले...
लोकमत न्यूज नेटवर्क
पंढरपूर: मराठे सामाजिक मागास नाहीत. गावाबाहेर राहा, शिवू नका, अशी मराठ्यांना अस्पृश्यतेची वागणूक मिळाली नाही. ईडब्ल्यूएस हेच मराठ्यांसाठी योग्य आरक्षण आहे, हे सर्वांना माहीत असतानाही मुंबईकरांना वेठीस धरण्यासाठी आंदोलन करण्यात येत असल्याचे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
पंढरपूर येथे एका कार्यक्रमानंतर पाटील म्हणाले की, राजकीय आरक्षण मिळविण्याची ही धडपड असून, येणाऱ्या पंचायत राज निवडणुकीत ओबीसी आरक्षण घेऊन राजकीय वापर करायचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, जरी ओबीसी दाखला मिळाला तरी त्याची व्हॅलिडिटी झाल्याशिवाय हे होऊ शकत नाही.
कायदेशीरदृष्ट्या ज्याचा दाखला नाही अशा मराठा समाजातील व्यक्तींना ओबीसीमधून आरक्षण मिळणे अशक्य आहे. आज वेळ मारून नेण्यासाठी जरी काही मागण्या तशाच मान्य केल्या तरी त्या कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाहीत. सगे-सोयरेबाबत अध्यादेश निघालेला आहे आणि लाखो समाज बांधवांना आता कुणबी दाखल्याचा लाभ होत आहे.
मर्यादा तोडणे शक्य नाही
शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांनी तामिळनाडूप्रमाणे का आरक्षण दिले नाही? असा सवाल करत तामिळनाडूचे आरक्षण अद्यापही सर्वोच्च न्यायालयात असून, ते टिकण्याची शक्यता नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.