अजितदादांच्या NCP त प्रवेशाची चर्चा असणाऱ्या नेत्याच्या घरी IT विभागानं टाकली धाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 12:31 IST2025-02-05T12:28:19+5:302025-02-05T12:31:16+5:30

अलीकडेच संजीवराजे पुन्हा अजितदादांच्या पक्षात घरवापसी करणार अशी चर्चा होती. 

IT department raids house of leader sanjeev raje naik nimbalkar who will be join Ajit Pawar NCP | अजितदादांच्या NCP त प्रवेशाची चर्चा असणाऱ्या नेत्याच्या घरी IT विभागानं टाकली धाड

अजितदादांच्या NCP त प्रवेशाची चर्चा असणाऱ्या नेत्याच्या घरी IT विभागानं टाकली धाड

सातारा - विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरी केंद्रीय तपास यंत्रणा आयकर विभागाने धाड टाकली आहे. काही दिवसांपासून संजीवराजे नाईक निंबाळकर पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा होती. त्यातच आज सकाळी आयकर विभागाच्या पथकाने संजीवराजे यांच्या घरावर धडक दिली. ६ वाजल्यापासून आयकर विभागाचे अधिकारी संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरी आहेत. 

सध्या अधिकाऱ्यांकडून संजीवराजे नाईक निंबाळकरांची चौकशी सुरू असून त्यांच्या बंगल्यात कुणालाही प्रवेश दिला जात नाही. संजीवराजे निंबाळकर यांच्यासोबत त्यांचे बंधू रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्याही घरी धाड पडली आहे. हे दोघे रामराजे नाईक निंबाळकरांचे चुलत बंधू आहेत. संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यानंतर अलीकडेच संजीवराजे पुन्हा अजितदादांच्या पक्षात घरवापसी करणार अशी चर्चा होती. 

या कारवाईबाबत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी काही पत्रकारांशी संवाद साधला. त्यात ते म्हणाले की, संजीवराजे आणि माझ्या घरावर छापा टाकल्याचं कळाले, मी पुण्यात होतो. आता फलटणला पोहचलोय परंतु घरात जाऊ दिले जात नाही. आम्ही राजघराण्यातून येतो, त्यामुळे आमच्याकडे काही वेडवाकडं सापडेल असं वाटत नाही. आम्ही २ नंबरच्या विषयात नसतो असं त्यांनी सांगितले. 

दरम्यान, कित्येक वर्ष आम्ही राजकारणात आहोत, आजोबादेखील मंत्री होते पण असं कधी घडलं नव्हते. देशाला लाखो रुपये देणारं आमचं कुटुंब होते, आमचं संस्थान विलीन केले तेव्हा शासकीय कार्यालये आमच्या इमारतीत आहेत. लोकशाहीत सामील झालेल्या घराण्यावर अशी वेळ येणे दुर्दैव आहे असं रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले. 

Web Title: IT department raids house of leader sanjeev raje naik nimbalkar who will be join Ajit Pawar NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.