Vaibhav Khedekar News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार २५ ऑगस्ट रोजी कोकणातील नेते वैभव खेडेकर यांना मनसेतून बडतर्फ करण्यात आले होते. यानंतर वैभव खेडेकर यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, वैभव खेडेकर यांचा पक्षप्रवेश दोन ते तीन वेळा रखडला. वैभव खेडेकर शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईतही दाखल झाले होते. परंतु, वैभव खेडेकर यांच्या पक्ष प्रवेशाला मुहूर्त काही मिळाला नाही. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या असून, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी वैभव खेडेकर यांच्या रखडलेल्या पक्ष प्रवेशावर सूचक शब्दांत भाष्य केले आहे.
वैभव खेडेकर यांचा भाजपा प्रवेश ४ सप्टेंबर २०२५ रोजी निश्चित करण्यात आला होता. भाजपा नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी तसे जाहीर केले होते. परंतु, राज्यातील आरक्षणाच्या मुद्द्यामुळे वैभव खेडेकर यांचा पक्ष प्रवेश पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले गेले. यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्यांदा वैभव खेडेकर यांचा भाजपातील पक्ष प्रवेश पुढे ढकलण्यात आला होता. यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली.
पक्ष प्रवेश रद्द होणे हे एखाद्या कार्यकर्त्याचे खच्चीकरण
वैभव खेडेकर समाजामध्ये तळा-गाळात जाऊन काम करणारे व्यक्तिमत्व आहे. माझे अतिशय जवळचे मित्र आहेत. त्यांचा पक्षप्रवेश तीन वेळा का रद्द झाला हे मलाही समजले नाही. माझे एक राजकीय मत सांगतो की अशा पद्धतीने पक्षप्रवेश रद्द होणे म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याचे खच्चीकरण आहे. ते होऊ नये हीच माझी भूमिका आहे. त्यांनी कुठच्या पक्षात जावे, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आहे, असे उदय सामंत म्हणाले. यानंतर वैभव खेडेकर शिवसेनेत आले तर पक्षप्रवेश करून घेणार का? असा प्रश्न पत्रकारांनी उदय सामंत यांना विचारला.
वैभव खेडेकर शिवसेनेत आले तर पक्षप्रवेश करून घेणार का?
आपण भाजपबद्दल बोलत आहोत, खेडेकर भाजपात चालले आहेत ना, मग त्यांच्याजवळ तुम्ही बोला, ते इथे येतात का बघा आणि मला सांगा. तुमची त्यांची ओळख असेल, तर तुम्ही सांगा त्यांना आणि ते येणार असतील, तर माझी भेट घालून द्या, मग निर्णय घेतो, पण पक्षप्रवेश असा तीन वेळा रद्द होणार नाही याचीही हमी देतो, असा चिमटा उदय सामंत यांनी यावेळी काढला.
दरम्यान, मला माहिती होते की, पक्षप्रवेश होणार नाही. मात्र मोठ्या संख्येत लोक आले होते म्हणून मी त्यांना घेऊन आलो. काही लोक म्हणत होते की वैभव म्हणजे कोकण नव्हे. म्हणून मी कोण आहे हे दाखविण्यासाठी या लोकांना सोबत घेऊन आलो. मी भाजपाचे काम सुरू केले आहे. पक्ष प्रवेश ही फक्त औपचारिकता राहिली आहे. यापूर्वी कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर ठरले आणि रविंद्र चव्हाण यांची भेट घेतली. यानंतर लगेचच आम्ही भाजपाचे काम सुरू केले. मी २० वर्षे मनसेचे काम केले. यापेक्षा आता दुप्पट ताकदीने भाजपाचे काम करणार आहे. कोकणात कमळ फुलवण्याचे काम आम्ही करू. भाजपाप्रवेश होईल हे मात्र निश्चित आहे, असे वैभव खेडेकर म्हणाले होते.
Web Summary : Vaibhav Khedekar's BJP entry was repeatedly postponed. Uday Samant hinted at Shiv Sena entry, criticizing the repeated delays as demoralizing. Khedekar affirms commitment to BJP work.
Web Summary : वैभव खेडेकर का भाजपा प्रवेश बार-बार स्थगित हुआ। उदय सामंत ने शिवसेना में शामिल होने का संकेत दिया, देरी को मनोबल गिराने वाला बताया। खेडेकर ने भाजपा के प्रति प्रतिबद्धता जताई।