Ujjwal Nikam Santosh Deshmukh Case: वाल्मीक कराड याने संतोष देशमुख खून प्रकरणातून मला दोषमुक्त करावे, असा अर्ज दिला होता, तो न्यायालयाने फेटाळून लावला आहे. दुसरा आरोपी विष्णू चाटे आणि इतर सर्व आरोपींनी आम्हाला या खटल्यातून वगळावे, दोषमुक्त करावे, अशा तऱ्हेचा अर्ज दिला. त्यावर मी जोरदार हरकत घेतली. न्यायालयाला सांगितले की, ही आरोपींची एक मोडस ऑपरेंडी आहे. एका आरोपीचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळल्यानंतर दुसऱ्याने अर्ज करायचा, मग तिसऱ्याने अर्ज करायचा. असे करून वेळेचा अपव्यय करायचा. खटला लांबवत न्यायचा हा त्यांचा प्रयत्न आहे. म्हणून न्यायालयाला विनंती केली की, सगळ्या आरोपींना दोषमुक्तीचा अर्ज करायचा असेल, तर तो त्यांनी एकाच वेळी करावा. त्याप्रमाणे न्यायालयात आज विष्णू चाटेपासून उर्वरित सात आरोपी आहेत. त्यांनी दोषमुक्तीचा अर्ज केला आहे, अशी माहिती ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी दिली. ते पत्रकारांशी बोलत होते. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात झाली. या सुनावणीत काय घडले, याबाबत उज्ज्वल निकम यांनी पत्रकारांना सांगितले.
या सर्व अर्जांना न्यायालयात आम्ही खुलासा दिलेला आहे. तसेच वाल्मीक कराड याने स्वतःची जामिनावर मुक्तता करण्यासाठी अर्ज दिला आहे. त्यावर आम्ही आमचे म्हणणे देत आहोत. त्यालाही आम्ही विरोध करत आहोत, असे उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केले. तसेच न्यायालयाने कोणत्या पद्धतीने आरोपपत्र त्यावर दाखल करावे, याकरिता न्यायालयाच्या मदतीसाठी आम्ही ड्राफ्ट चार्ज दिलेला आहे आणि आरोपी वाल्मीक कराड याच्यासह इतर साथीदार यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या कलमांखाली बारा ते तेरा आरोप ठेवण्यात यावेत, निश्चित करावेत. अशा तऱ्हेचा विनंती अर्ज केला आहे, असे उज्ज्वल निकम यांनी सांगितले.
या सगळ्या याचिकांवरील पुढील सुनावणी ४ ऑगस्ट रोजी होणार
आरोपींनी दोषमुक्तीचा जो अर्ज दिला आहे. त्यावर ज्यावेळेस निकाल येईल, त्यावेळेसच त्याची सुनावणी घेतली जाईल. एकदा न्यायालयाने आरोप निश्चित केले की, मग प्रत्यक्ष खटल्याला सुरुवात होईल. विष्णू चाटे आणि इतर आरोपींनी न्यायालयात दोषमुक्तीसाठी जो अर्ज दिला आहे, तो विलंबाने दिला आहे. भारतीय नागरिक संरक्षण संहितेनुसार, असा अर्ज आरोपपत्र दाखल झाल्यानंतर दोन महिन्यांच्या आत दाखल करायला हवा होता, त्यांनी तसा तो केलेला नाही. विलंब माफीचा अर्जही केलेला नाही. त्यामुळे न्यायालयाने त्यांचे अर्ज तडकाफडकी फेटाळून लावावेत, अशा पद्धतीची मागणी आम्ही केलेली आहे. या सगळ्या याचिकांवरील पुढील सुनावणी ४ ऑगस्ट रोजी होणार आहे, अशी माहिती उज्ज्वल निकम यांनी दिली.
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार की नाही?
तुमची आता खासदार म्हणून राज्यसभेत नियुक्ती झाली आहे. या खटल्याकडे दुर्लक्ष होऊ शकते. त्यामुळे आपणच या खटल्यात लक्ष घालावे, अशी मागणी देशमुख कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे. या खटल्यावर काही फरक पडेल का, असे पत्रकारांनी विचारले. यावर बोलताना, माझे सहकारी बाळासाहेब कोल्हे हे माझ्याइतकेच कॉम्पिटंट आहेत. आपण त्याबद्दल निश्चिंत राहावे. या खटल्याची तातडीने सुनावणी होईल, असे उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असे आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणत आहोत. त्या दिशेनेच सगळा प्रयत्न सुरू आहे. न्याय मागत आहोत आणि तशीच आमची अपेक्षा आहे. उज्ज्वल निकम खासदार झाल्यानंतर या खटल्याचे पुढे काय होणार, याबाबत आम्ही प्राथमिक चर्चा केली होती. सविस्तर चर्चा निकम यांच्याशी करणार आहोत. तेदेखील स्पष्टीकरण देतील की, यापुढे या खटल्याची रुपरेषा कशी असेल, अशी प्रतिक्रिया मृत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दिली.