वक्फ विधेयकावरून संसदेत गरमा-गरम चर्चा सुरु आहे. आज हे सुधारणा विधेयक मांडण्यात आले आहे. यावेळी सत्ताधारी युतीच्या नेत्यांनी विधेयकाच्या बाजुने आणि विरोधकांनी विधेयकाच्या विरोधात भाषणे दिली. परंतू, ठाकरे गटाच्या खासदारांनी वक्फ बिलाला ना स्पष्ट विरोध केला ना बाजू घेतली. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत तब्बल १० मिनिटे बोलत होते. परंतू, त्यांनी वक्फ विधेयकाविरोधात कठोर भूमिका न मांडता भाजपा आणि हिंदुत्व आणि मंदिरांची लुबाडणूक या विषयावर भाषण दिले.
सावंत यांच्या भाषणावरून ना विरोध स्पष्ट झाला ना समर्थन. सावंत यांनी वक्फ बोर्डामध्ये गैर मुस्लिमांना स्थान देण्यावर आक्षेप घेतला. हिंदुंच्याही मंदिरांमध्ये गैर हिंदू नेमले तर आम्ही त्याला विरोध करू, तुमचा यामागे हेतू काय आहे. उद्या ख्रिश्चनांबाबत होईल, शिखांबाबत होईल, असा इशारा सावंत यांनी दिला. तसेच हिंदू मंदिरांचा खजिना हडपल्याचा आरोप करत केदारनाथ मंदिरातून सोन्याच्या चोरीचे उत्तर अद्याप मिळाले नसल्याचे म्हटले आहे. भाजपने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. तसेच वक्फ दुरुस्ती विधेयकाला 'सौगत-ए-वक्फ विधेयक'असे म्हटले.
मी जेपीसीमध्येही सांगितले की तुमचा हेतू काही ठीक दिसत नाहीय. इथेही सांगतोय. जशी काश्मीरमध्ये हडपण्याचे काम केले तसेच तुम्हाला वक्फची जमिन हडपायची आहे. तुमचे हृदय साफ नाहीय. या विधेयकाने कोणाला न्याय मिळणार नाहीय. तुम्ही हे चांगले करत नाही आहात. दुर्दैवाने ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी काहीही केले नाही तेच सरकार चालवत आहेत. जर तुम्ही आमच्या मंदिरात कोणत्याही गैर-हिंदूला आणण्याचा प्रयत्न केला तर शिवसेना त्याला विरोध करेल. काश्मीरमध्ये ३७० कलम हटविले तेव्हा मी त्याचे स्वागत केले. मी मंत्री होतो. म्हटले चांगले झाले. पण तिथे किती हिंदू आले, असा सवाल त्यांनी केला.
वक्फ विधेयकातील गैर मुस्लिम सदस्यांवरून हिंदूंच्या मंदिरात जेव्हा असे होईल तेव्हा आम्ही विरोध करू असे म्हणत सावंत यांनी भविष्यातील विरोधावर भाष्य केले. हिंदुत्व, भाजपा आणि इतर विषयांवरच सावंत यांनी भाष्य करत वक्फ विधेयकाविरोधात स्पष्टपणे भूमिका मांडली नाही. यामुळे ठाकरे गटाचा विरोध आहे की समर्थन याबाबत काहीच स्पष्ट झाले नाही, असे वृत्त एनबीटीने दिले आहे.