स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या फोडाफोडी आणि कुरघोडीच्या राजकारणामुळे राज्यातील सत्ताधारी असलेल्या महायुतीमधील भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांचे संबंध कमालीचे बिघडले आहेत. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याचे संकेत मिळत आहेत. नुकत्याच झालेल्या बिहारमधील नवनियुक्त सरकारच्या शपथविधीवेळी दोन्ही नेत्यांकडून एकमेकांना टाळण्याच्या झालेल्या प्रयत्नांमुळे महायुतीमध्ये सारं काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत.
विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या सरकारचा शपथविधी नुकताच पार पडला. या शपथविधीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार उपस्थित होते. मात्र या शपथविधीदरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या देहबोलीवरून हे दोन्ही नेते एकमेकांवर नाराज असल्याचे दिसून येत होते. या शपथविधी सोहळ्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे वेगवेगळ्या विमानांमधूना पाटणा येथे गेले. तसेच शपथविधीवेळीही ते लांब लांब बसल्याचे दिसून आले. तर येथून येतानाही दोन्ही नेते वेगवेगळ्या विमानांमधून आले. एवढंच नाही तर आज हुतात्मा स्मारकाजवळील कार्यक्रमावेळी समोरासमोर आल्यावर शिंदे आणि फडणवीस यांनी केवळ औपचारिकता म्हणून एकमेकांना अभिवादन केले आणि दोघेही बाजूला झाल्याचे दिसले. एवढंच नाही तर या कार्यक्रमानंतर महायुतीमधील नाराजीबाबत विचारले असता एकनाथ शिंदे यांनी त्या प्रश्नाला बगल देत विषय टाळण्याचा प्रयत्न केला.
मात्र सरकारमधील दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फणडवीस हे एकाच विमानाने बिहारला गेले. तसेच तिथेही एकत्रच दिसले. या घटनाक्रमामुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील संबंध खूपच बिघडले असल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Web Summary : Rumors suggest strain between Fadnavis and Shinde due to political maneuvering before local elections. Their separate travel and distant interactions in Bihar fuel speculation of discord within the ruling coalition.
Web Summary : स्थानीय चुनावों से पहले राजनीतिक चालों के कारण फडणवीस और शिंदे के बीच तनाव की अफवाहें। बिहार में उनकी अलग-अलग यात्रा और दूर की बातचीत सत्तारूढ़ गठबंधन के भीतर असहमति की अटकलों को हवा देती है।