मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 20:24 IST2025-07-03T20:24:14+5:302025-07-03T20:24:37+5:30
Sharad Pawar News: जयंत पाटील मला भेटले होते. आमच्या अध्यक्षांचा निर्णय आम्हाला शिरसावंद्य असतो, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
Sharad Pawar News: हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून राज्यात वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. पहिली पासून हिंदीची सक्ती नको, अशी भूमिका राज्यातील अनेक संघटना आणि विरोधी पक्षांची होती. याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्रित येऊन मोर्चा काढणार होते. परंतु, त्यापूर्वीच सरकारकडून त्रिभाषा सूत्राचे दोन्ही जीआर रद्द करण्यात आले. मात्र आता त्याच दिवशी ठाकरे बंधू एकत्र येऊन विजयी मेळावा साजरा करणार आहेत. यावरून महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. या मेळाव्याचे निमंत्रण काँग्रेसला देण्यात आलेले नसून, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला आता शरद पवारही जाणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे.
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याचे निमंत्रण काँग्रेसला मिळाले नसल्याचे म्हटले जात आहे. आम्हाला अजून तसे काही निमंत्रण मिळालेले नाही किंवा सांगण्यात आलेले नाही. कदाचित हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा इव्हेंट असू शकतो. ५ जुलै हा मोर्चा काढण्यासाठी दिवस ठरला होता. पण हा जीआर रद्द झाला आहे असे मला अजूनही वाटत नाही. कारण नरेंद्र जाधव समिती नेमली आहे. त्यामुळे ‘मुंह में राम, बगल में नथुराम’ या भाजपाच्या नितीपासून जपून राहणे आवश्यक आहे. ५ जुलैचा दिवस मराठी लोक साजरा करतील, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी दिली होती. यानंतर आता शरद पवार हेही ठाकरे बंधूंच्या कार्यक्रमाला हजर राहणार नाहीत.
तुम्ही या मेळाव्याला जाणार का? शरद पवार म्हणाले...
पत्रकारांशी संवाद साधत असताना शरद पवार यांना यासंदर्भात प्रतिक्रिया विचारण्यात आली. मराठीच्या मुद्द्यावर ०५ जुलै रोजी ठाकरे बंधू एकत्र येऊन विजयी मेळावा घेत आहेत, यात तुमचा पक्ष सहभागी असणार का, असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. यावर बोलताना, ठाकरे बंधूंच्या मेळाव्याबाबत माहिती नाही. आमच्या पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील हे काल मला भेटले होते. ते म्हणाले होते की, या सगळ्या कामात आम्ही सहभागी होणार आहोत. त्यामुळे पक्षाच्या अध्यक्षांचा निर्णय हा आम्हाला शिरसावंद्य असतो, असे शरद पवार यांनी सांगितले. तुम्ही या मेळाव्याला जाणार का, असा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर शरद पवार यांनी नकारात्मक उत्तर दिले. नाही. मी त्या मेळाव्याला जाणार नाही. माझे कार्यक्रम दुसरीकडे आहेत, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत काँग्रेस ही उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्याशीच युतीबाबत चर्चा करणार असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची उद्धव सेनेशी जवळीक वाढल्याच्या मुद्द्यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, हा त्यांचा घरगुती विषय आहे. एखादा व्यक्ती काँग्रेसच्या विचारांना पूर्णपणे विरोध करणारा असेल, तर आम्ही त्या युतीला आक्षेप घेऊ; अन्यथा त्या दोघांनी एकत्र येणे, हा त्यांचा अंतर्गत मामला आहे. राज ठाकरे हे महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ नेते आहेत. ते आपल्या सभांमध्ये मोठी गर्दी खेचतात. मात्र, त्याचे मतदानात रुपांतर होत नाही. त्यामुळे सध्याच्या विधानसभेत त्यांच्या पक्षाचे अस्तित्व जाणवत नाही.