सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 16:30 IST2025-06-13T16:30:20+5:302025-06-13T16:30:49+5:30
शाहबाज यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट देखील शेअर केली आहे...

सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
इस्रायलने शुक्रवारी सकाळच्या सुमारास इराणवर जबरदस्त हवाई हल्ला केला आहे. यानंतर आता इराण आणि इस्रायलमधील तणाव आणखीनच वाढला आहे. यातच, इस्रायल डिफेन्स फोर्सने (आयडीएफ) इराणी लष्कराच्या वरिष्ठ कमांडर्सना ठार केल्याचाही दावा केला आहे. यानंतर, आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही इस्रायल-इराण युद्धात उडी घेतली आहे. त्यांनी इस्रायलवर टीका करत, हे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. शाहबाज यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट देखील शेअर केली आहे.
पाकिस्ताचे पंतप्रधान एक्सवर पोस्ट करत म्हणाले, ""मी इराणवरील हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. या हल्ल्यात झालेल्या मृत्युंबद्दल मी इराणी जनतेप्रती तीव्र संवेदना व्यक्त करतो. हे एक अतिशय बेजबाबदार आणि चिंताजनक कृत्य आहे. आधीच अस्थिर असलेल्या प्रदेशात आणखी अस्थिरतेचा निर्माण होण्याचा धोका आहे. जागतिक शांतता धोक्यात आणणाऱ्या कोणत्याही कृतीला रोखण्यासाठी आम्ही आंतरराष्ट्रीय समुदाय आणि संयुक्त राष्ट्रांना त्वरित पावले उचलण्याचे आवाहन करतो."
काय म्हणाले, इस्रायल डिफेंस फोर्स -
आयडीएफने आपल्या आधिकृत 'एक्स' हँडलवर म्हटले आहे, "आता आम्ही पुष्टी करू शकतो की, इस्रायलने इराणवर केलेल्या २०० हून अधिक लढाऊ विमानांच्या हल्ल्यात इराणी सशस्त्र दलांचे प्रमुख, आयआरजीसीचे कमांडर आणि इराणच्या आपत्कालीन कमांडचे कमांडर हे सर्व ठार झाले आहेत."
आयडीएफने म्हटले आहे की, आपल्याला नुकत्याच मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, इराण अण्वस्त्र बनण्याच्या शर्यतीत अशा बिंदूवर जाऊन पोहोचला आहे, जेथून माघारी फिरणे शक्य नाही.
इस्रायलच्या हल्ल्यानंतर, इराणनेही इस्रायलला प्रत्युत्तर दिले आहे. इराणने गेल्या काही तासांत 100 हून अधिक ड्रोन सोडले आहेत. इस्रायल डिफेन्स फोर्सचे (आयडीएफ) प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल एफी डेफ्रिन यांच्या मते आयडीएफ ड्रोन्स पाडण्यासाठी काम करत आहे.