गांधीजींच्या हत्येचा तपास नव्याने नाही
By Admin | Updated: June 7, 2016 07:43 IST2016-06-07T07:43:08+5:302016-06-07T07:43:08+5:30
महात्मा गांधी यांच्या हत्येची चौकशी एका आयोगामार्फत नव्याने करण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका सोमवारी उच्च न्यायालयाने फेटाळली

गांधीजींच्या हत्येचा तपास नव्याने नाही
मुंबई : महात्मा गांधी यांच्या हत्येची चौकशी एका आयोगामार्फत नव्याने करण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका सोमवारी उच्च न्यायालयाने फेटाळली. एवढ्या जुन्या प्रकरणाची चौकशी करण्याची आवश्यकता नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
गांधी हत्या प्रकरण फार पूर्वीच संपले असून आता पुन्हा नव्याने या प्रकरणाची चौकशी करण्याची आवश्यकता नाही. जुन्या प्रकरणावर सुनावणी घेण्यासाठी उच्च न्यायालय अधिकारांचा वापर करू शकत नाही, असे न्या. व्ही.एम. कानडे व न्या. एम.एस. सोनक यांच्या खंडपीठाने म्हटले.
गांधीजींच्या हत्येचा तपास नव्याने करण्यात यावा, माझ्याकडे फॉरेन्सिक पुरावे आहेत, असे याचिकाकर्ते अभिनव भारतचे विश्वस्त, लेखक, संशोधक डॉ. पंकज फडणीस यांनी खंडपीठाला सांगितले.
न्यायालयाने जुन्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्याचा अधिकार नाही, असे म्हटल्यावर डॉ. फडणीस यांनी सुप्रीम कोर्टातील कोहिनूर हिऱ्याची केस खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिली. (प्रतिनिधी)
>४ गोळ्या झाडल्याचा दावा
चौकशीसाठी नेमलेल्या तत्कालीन जे. एल. कपूर आयोगाने सखोल चौकशी केली नाही. कटाबाबत नीट माहिती या अहवालात उपलब्ध नाही. त्यामुळे याची सखोल चौकशी करण्यासाठी नव्याने आयोग नेमण्यात यावा, अशी मागणी डॉ. पंकज फडणीस यांनी याचिकेद्वारे केली होती.