राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 05:03 PM2024-05-22T17:03:04+5:302024-05-22T17:05:58+5:30

लहान मुलांमधील लठ्ठपणा या विषयावर राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांची संयुक्त मुलाखत घेण्यात आली. 

Interview with Devendra Fadnavis and Raj Thackeray on World Child Obesity Day | राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

मुंबई - वर्ल्ड चाइल्ड ओबेसिटी दिनानिमित्त एका सामाजिक संस्थेकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची संयुक्त मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत लहान मुलांमधील लठ्ठपणा आणि त्यावरील उपाय यावर प्रश्नोत्तरे झाली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी लठ्ठपणाबाबत केंद्र आणि राज्य सरकारकडून होणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली तर राज यांनीही त्यांच्या मिश्किल शैलीत मुलाखतीतील प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. 

या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, २०१४-१५ मध्ये नॅशनल सर्व्हे झाला, त्यातून लहान मुलांमधील लठ्ठपणा ही समस्या जाणवून आली. सर्व शाळांमध्ये २ शिक्षक प्रशिक्षित करायचे, त्यांना लठ्ठपणाबाबत सर्व माहिती असायला हवी. केंद्राने याबाबत एक मोहिम हाती घेतली आहे. त्यानुसार जो मुलगा लठ्ठपणाकडे चाललाय त्याला आणि त्याच्या पालकांना याबाबत जागरूकता निर्माण करण्याचं काम त्यातून होणार आहे. केंद्र आणि राज्य सरकार दोघांनी शाळांना पीटीचा क्लास बंधनकारक केला असून विनामैदान शाळांना परवानगी नाही.  मैदानावर मुलं खेळण्यासाठी जात नाहीत. सर्व डिजिटल गेमकडे वळले आहेत. त्यामुळे शाळांमध्ये मुलांनी मैदानावर जावं, काही खेळ खेळावे यासाठी प्रयत्न होतायेत. खेळो इंडियाच्या माध्यमातून मुलांना मैदानी खेळाकडे जाण्यासाठी प्रोत्साहन केले जातंय. खेळ प्रोफेशनली करिअर होऊ शकते यादृष्टीने पालकही विचार करू लागले आहेत असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत कॅलरी काऊंट लिहिणं हे बंधनकारक करतोय. रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये असे कॅलरी चार्ट लावण्यासाठी प्रयत्न झाले त्यातून जागरुकता निर्माण होऊ शकते. जे पॅक फूड आहे त्यावर न्यूट्रिशन व्हॅल्यू आणि अन्य गोष्टी त्यावर मेन्शन कराव्या लागतात. फास्ट फूडकडून सूपर फूडकडे कसं जाता येईल यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. जोपर्यंत आपण पर्याय देणार नाही तोपर्यंत लहान मुले फारसं ऐकणार नाहीत. आताची पिढी जागरूक आहे. पर्यावरणाबाबतही १२-१३ वर्षाची मुले जागरूक आहेत. परंतु आपण जे अन्न खातोय त्याबाबतही जागरुकता नाही. त्यामुळे आपल्या शरीरासाठी काय वाईट आहे हे आपण या पिढीला सांगू शकलो तर त्यातून जागरुकता वाढेल असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. 

राज ठाकरेंची मिश्किल उत्तरं, सभागृहात हशा 

आजारांचा राजा असलेला लठ्ठपणा याबाबत काय करता येईल असा प्रश्न राज ठाकरेंना विचारण्यात आला. त्यावेळी मिश्किलपणे राज ठाकरेंनी हे जर मला कळालं असतं तर मीच वजन कमी केले नसतं का? आमच्या सुनेच्या रुपाने डॉक्टर माझ्या आयुष्यात आले तेव्हापासून माझं वजन वाढायला लागलं. मी सकाळी टेनिस खेळायला जातो, त्यातून ४७० कॅलरी जातात हे मला आज दिसलं, त्यामुळे मी तरी योग्य मार्गावर आहे असं उत्तर त्यांनी दिले. 

त्याशिवाय लहान असताना आम्ही डोंगरे बालामृत ऐकलं होतं, ज्यानं पोरं गुबगुबीत होतात. आता तुम्ही सांगतायेत, पोरं गुबगुबीत असून चालणार नाही, त्यामुळे बोरूडे बालामृत...आई वडिलांना मुल गुबगुबीत आहे पण तो आजार आहे हे कळायला मार्ग नाही. मुलांचा लठ्ठपणा ओळखायचा कसा हे पालकांना कळायला हवा. बाहेरचं फास्टफूड आल्यापासून लठ्ठपणा जगभर बळावतोय. जोपर्यंत घरातील जेवण खात होते, तोपर्यंत लठ्ठपणा नव्हता. मी जपानमधील शाळांचे व्हिडिओ पाहिले होते. तिथे डबा आणू देत नाहीत. आपल्याकडे आई वडिलांकडून डबा दिला जातो, त्याच बऱ्याच प्रमाणात या गोष्टी सरकवल्या जातात. शाळांनी जर आहाराची जबाबदारी स्वीकारली तर त्यातून लठ्ठपणाचा विषय राहणार नाही असं राज ठाकरेंनी सांगितले. दरम्यान, मुलाखतीच्या शेवटी राज यांनी फडणवीसांना दिल्लीला जायचंय आणि मी देखील चायनीजची ऑर्डर दिलीय असं सांगताच सभागृहात हशा पिकला. 

Web Title: Interview with Devendra Fadnavis and Raj Thackeray on World Child Obesity Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.