महाराष्ट्र सदनातील शाहू महाराज, यशवंतराव चव्हाण यांचे पुतळे बदलण्यासाठी वेळप्रसंगी तीव्र आंदोलन; लोकप्रतिनिधी काय भूमिका घेणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 18:17 IST2026-03-11T18:15:58+5:302026-03-11T18:17:28+5:30

‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर सामाजिक संघटनांचा इशारा

Intense agitation from time to time to replace the statues of Shahu Maharaj and Yashwantrao Chavan in Maharashtra Sadan What role will the people's representatives take | महाराष्ट्र सदनातील शाहू महाराज, यशवंतराव चव्हाण यांचे पुतळे बदलण्यासाठी वेळप्रसंगी तीव्र आंदोलन; लोकप्रतिनिधी काय भूमिका घेणार?

महाराष्ट्र सदनातील शाहू महाराज, यशवंतराव चव्हाण यांचे पुतळे बदलण्यासाठी वेळप्रसंगी तीव्र आंदोलन; लोकप्रतिनिधी काय भूमिका घेणार?

कोल्हापूर : सर्वसामान्य कोल्हापूरवासीयांना दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील छत्रपती शाहू महाराज आणि यशवंतराव चव्हाण यांचे पुतळे खटकत होतेच. हीच भावना ‘लोकमत’ने पुन्हा एकदा मांडल्यानंतर अनेक सामाजिक संघटनांनी वेळप्रसंगी आंदोलन छेडण्याचा इशारा मंगळवारी दिला.

याआधीही हा विषय एकदा ऐरणीवर आला होता. त्यावेळी याची तातडीने दखल घेत विधानसभेत चर्चा होऊन पुतळा बदलण्याचा निर्णय झाल्यानंतर आता ती कार्यवाही सुरू असेल अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना झाली होती. परंतु गेल्या पावणेदोन वर्षांत महाराष्ट्र शासनाने याबाबत काहीच हालचाल केली नसल्याने कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. हे दोन्ही पुतळे विसंगत असल्याने ते तातडीने बदलावेत या मागणीसाठी जिल्हाधिकारी, खासदार, आमदार यांना निवेदने देण्याचा आणि प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचीही भेट घेण्याचा निर्धार करण्यात आला.

‘मावळा कोल्हापूर’ संघटनेचे अध्यक्ष उमेश पोवार म्हणाले, दिल्लीसारख्या ठिकाणी असे पुतळे असणे हे अशोभनीय आहे. वास्तविक याबाबत आधीच निर्णय होणे अपेक्षित होते. परंतु तो झालेला नाही. याबाबत खासदार शाहू छत्रपती यांची भेट घेऊन या विषयामध्ये त्यांना पुढाकार घेण्याची विनंती करणार आहोत.

करवीर तालुक्यातील वाकरे येथील शिवशाहू संघटनेचे अध्यक्ष विक्रम कांबळे म्हणाले, दसरा चौकातील शाहू महाराजांचा पुतळा आणि दिल्लीतील पुतळा यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. आम्ही याबाबत सर्व लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोतच. परंतु त्यातूनही काही निर्णय झाला नाही तर मग नेमके कोणत्या प्रकारचे आंदोलन करायचे याचा निर्णय कार्यकर्ते घेतील.

चुकीच्या स्वरूपाचे पुतळे उभारणे म्हणजे त्या महान नेत्यांचा सन्मान नव्हे तर अप्रत्यक्षपणे त्यांचा अपमानच आहे. देशाच्या राजधानीत महाराष्ट्राच्या महापुरुषांची अशी चुकीची प्रतिमा उभी राहणे अत्यंत दुर्दैवी आहे. शासनाने तत्काळ हस्तक्षेप करून हे पुतळे दुरुस्त करावेत किंवा योग्य पुतळे उभारावेत अशी प्रतिक्रिया श्रीमंत संभाजीराजे छत्रपती सोशल फाउंडेशनचे प्रमुख वासीम मोमीन यांनी व्यक्त केली आहे.

लोकप्रतिनिधी काय भूमिका घेणार?

जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार यांचे अनेकदा दिल्लीला जाणे होते. महाराष्ट्र सदनातील हे दोन्ही पुतळे त्यांनी पाहिलेही आहेत. त्यातील विसंगती त्यांना त्यावेळी जाणवली नसेल. परंतु आता हा प्रश्न समोर आल्यानंतर याबाबत त्यांनी निर्णायक भूमिका घेणे आवश्यक आहे. त्यामुळे याबाबत ही सर्व मंडळी नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

छत्रपती शाहू महाराज आणि यशवंतराव चव्हाण यांच्या दिल्लीतील विसंगत पुतळ्याबाबत याआधीही चर्चा झाली आहे. खासदार शाहू छत्रपती यांनाही हा मुद्दा पटला आहे. परंतु अजून या पुतळ्यांबाबत निर्णय झाला नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आता पुन्हा नव्याने या विषयावर तीनही खासदारांनी आवाज उठवावा. - व्ही. बी. पाटील, अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, कोल्हापूर केंद्र

Web Title: Intense agitation from time to time to replace the statues of Shahu Maharaj and Yashwantrao Chavan in Maharashtra Sadan What role will the people's representatives take