पुणे : राज्यात सप्टेंबर २०१८ पासून झालेली सर्व औद्योगिक वीज दरवाढ संपूर्ण रद्द करावी, औद्योगिक वीज दर नोव्हेंबर २०१६ च्या आदेशानुसार मार्च २०२० पर्यंत कायम ठेवण्यात यावेत, दरफरकारची रक्कम सरकारने अनुदान म्हणून द्यावी या मागणीसाठी औद्योगिक संघटना येत्या १२ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वीज बिलाची होळी करणार आहेत. राज्यातील औद्योगिक वीज दर वाढवू नयेत या साठी विविध संघटनांकडून आंदोलन करण्यात येत आहे. त्यासाठी सरकारने सप्टेंबर २०१८ ते मार्च २०२० पर्यंतच्या दरफरकापोटी ३४०० कोटी रुपयांचे अनुदान महावितरण कंपनीस देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढण्यात येणार आहेत. यात संबंधित जिल्ह्यातील व्यासायिक आणि उद्योजक सहभागी होतील. पुणे, नवी मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अकोला यासह २० जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन होणार असल्याची माहिती महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व समन्वय समितीचे निमंत्रक प्रताप होगाडे यांनी दिली.या शिवाय जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार या लोकप्रतिनिधींना भेटून मागण्यांचे निवेदन देण्यात येईल. वीज दर वाढ विरोधी पोस्टर्स, बॅनर्स लावून जनजागृती करण्यात येत असल्याचे आंदोलकांच्या वतीने सांगण्यात आले.
राज्यातील औद्योगिक संघटना १२ फेब्रुवारीला करणार वीज बिलाची होळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 11:41 IST
पुणे, नवी मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अकोला यासह २० जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन होणार आहे.
राज्यातील औद्योगिक संघटना १२ फेब्रुवारीला करणार वीज बिलाची होळी
ठळक मुद्देजिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार या लोकप्रतिनिधींना भेटून मागण्यांचे निवेदन देणार