भारतीय रेल्वे विद्युतीकरणाची 100 वर्षे; पण धूळ खात पडून देशातील पहिले इलेक्ट्रिक इंजिन..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 19:37 IST2025-01-28T19:36:21+5:302025-01-28T19:37:32+5:30
भारतीय रेल्वेच्या ऐतिहासिक वारशाकडे दुर्लक्ष केले जात आहे.

भारतीय रेल्वे विद्युतीकरणाची 100 वर्षे; पण धूळ खात पडून देशातील पहिले इलेक्ट्रिक इंजिन..!
Railway Heritage Conservation: गेल्या काही काळापासून भारतीय रेल्वेत अतिशय वेगाने विकास होतोय, पण त्याचवेळी ऐतिहासिक बाबींकडेही दुर्लक्ष केले जात आहे. भारतातील पहिले इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह 'सर लेस्ली विल्सन' हे अनेक वर्षांपासून मध्य रेल्वेच्या हेरिटेज गॅलरीत जतन केले गेले आहे, परंतु आता त्याच हेरिटेज गॅलरीच्या जागेवर असलेल्या सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम आता सुरू आहे. त्यामुळेच हे ऐतिहासिक इंजिन सिमेंट, खडी, कचरा आणि मातीत गाडले गेल्याचे चित्र पाहायला मिलत आहे. या इंजिनची दुर्दशा पाहून, पुनर्विकासाच्या नावाखाली भारत आपला वारसा आणि इतिहास हरवत चालला आहे का? असा प्रश्न पडतोय.
सर लेस्ली विल्सन, भारतातील पहिले इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह, मुंबईच्या सीएसएमटी (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) च्या हेरिटेज गॅलरीत अनेक वर्षांपासून जतन केले गेले होते. हे इंजिन केवळ भारतीय रेल्वेच्या विद्युतीकरणाचे प्रतीक नाही, तर तांत्रिक नवकल्पनांचे ऐतिहासिक चिन्हही आहे.
लोणावळ्यात ऐतिहासिक वस्तूंचे संग्रहालय उभारण्यासाठी रेल्वेकडून जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे, मात्र अद्याप प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यापूर्वी स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम सुरू झाले असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी या दिली आहे. म्युझियमचे काम पूर्ण होताच तिथे हे इंजिन पाठवले जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, 2018 पासून हे इंजिन सीएसएमटी स्टेशनवर ठेवण्यात आले होते, मात्र 8 ते 9 महिन्यांपासून स्टेशनवर नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने त्याची अवस्था जैसे थे आहे.
भारतीय रेल्वे सध्या अनेक प्रमुख स्थानकांना आधुनिक आणि जागतिक दर्जाचे बनवण्यासाठी पुनर्विकास प्रकल्प राबवत आहे. सीएसएमटी स्थानकाचा पुनर्विकास हाही त्याचाच एक भाग आहे. मात्र, या प्रकल्पांमध्ये ऐतिहासिक स्थळे आणि वास्तूंच्या संवर्धनाला प्राधान्य दिलेले दिसत नाही. 18 एप्रिल 2018 रोजी जागतिक वारसा दिनानिमित्त मध्य रेल्वेचे तत्कालीन महाव्यवस्थापक डीके शर्मा यांनी सीएसएमटी येथील हेरिटेज कॉरिडॉरचे उद्घाटन केले. त्यात राज्याच्या विविध भागातून गोळा केलेल्या रेल्वेच्या ऐतिहासिक अवशेषांचा समावेश होता.
विशेष म्हणजे, 3 फेब्रुवारी 2025 रोजी भारतीय रेल्वे आपल्या विद्युतीकरणाच्या प्रवासाला 100 वर्षे पूर्ण करत आहे. मध्य रेल्वेने यानिमित्ताने अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मात्र, रेल्वे विद्युतीकरणाचा उत्सव साजरा करत असताना सर लेस्ली विल्सनसारख्या ऐतिहासिक वास्तूंकडे दुर्लक्ष केले जात आहे, ही विडंबना आहे. सर लेस्ली विल्सनसह इतर ऐतिहासिक वस्तू सीएसएमटीमध्ये कचरा आणि भंगारात पुरल्या गेल्या आहेत. हे अवशेष वेळीच जतन केले असते तर ही परिस्थिती उद्भवली नसती.
1853 मध्ये पहिली ट्रेन चालवल्यापासून ते आधुनिक विद्युतीकरणापर्यंत रेल्वेने भारताच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याचे ऐतिहासिक अवशेष आपल्या सांस्कृतिक आणि तांत्रिक विकासाची कहाणी सांगतात. रेल्वेच्या ऐतिहासिक वास्तू पर्यटन आणि शिक्षणाचे प्रमुख स्त्रोत बनू शकतात.