३७० रद्द करून भारताने पाकिस्तानचे मनसुबे उधळून लावले : अमित शहा
By Appasaheb.patil | Updated: September 1, 2019 21:44 IST2019-09-01T21:42:38+5:302019-09-01T21:44:23+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा सोलापुरात समारोप

३७० रद्द करून भारताने पाकिस्तानचे मनसुबे उधळून लावले : अमित शहा
सोलापूर : ३७० मुळे काश्मीर देशापासून दुरावलेला होतं. मात्र मोदीजींनी ते आपल्यात आणलं. काश्मीर कायमस्वरूपासाठी भारताचं झालं. ३७० रद्द करून पाकिस्तानचे मनसुबे उधळून लावले. पंतप्रधान मोदी यांच्याशिवाय कोणत्याही पंतप्रधानामध्ये ३७० रद्द करण्याची हिम्मत नसल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छातीठोकपणे सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोप कार्यक्रमासाठी अमित शहा सोलापुरात आले होते. इंदिरा गांधी स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत अमित शहा बोलत होते.
पुढे बोलताना अमित शहा म्हणाले की, राहुल गांधी आणि शरद पवार यांना विचारतो की 370 रद्द करण्याचं तुम्ही समर्थन करता की नाही? असेही ते म्हणाले. राहुल गांधी म्हणतात काश्मीर अशांत आहे. मात्र ५ आॅगस्टनंतर एकही गोळी काश्मीरमध्ये चालली नाही. राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा वापर पाकिस्तान करत आहे. राहुल गांधी आणि पाकिस्तान यांचं बोलणं एकच आहे, असेही ते म्हणाले. देशाला जेव्हा गरज होती तेंव्हा आम्ही तुमच्यासोबत होतो. राहुलजी आम्हाला तुमची गरज नाही, मात्र किमान शांत तरी राहा, असेही शाह म्हणाले.