समीर वानखेडेंनी केलेल्या सर्व कारवायांची स्वतंत्र चौकशी करा, काँग्रेसची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 07:17 PM2022-05-27T19:17:17+5:302022-05-27T20:18:05+5:30

Atul Londhe : एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी बॉलिवूडसह मुंबई व महाराष्ट्राचे नाव बदनाम करण्याचे काम केले आहे, असा आरोप अतुल लोंढे यांनी केला आहे. 

Independent inquiry into all actions taken by Sameer Wankhede, demanded by Congress leader Atul Londhe | समीर वानखेडेंनी केलेल्या सर्व कारवायांची स्वतंत्र चौकशी करा, काँग्रेसची मागणी

समीर वानखेडेंनी केलेल्या सर्व कारवायांची स्वतंत्र चौकशी करा, काँग्रेसची मागणी

googlenewsNext

मुंबई : कॉर्डिलिया क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानला क्लीनचिट देण्यात आली आहे. एनसीबीकडून शुक्रवारी सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. एकूण सहा हजार पानांच्या आरोपपत्रात आर्यन खानवर कोणताही ठपका ठेवण्यात आलेला नाही. या प्रकरणी बोलताना आर्यन खानला केलेली अटक हा एक पूर्वनियोजित कट होता, हे एनसीबीने आर्यनला दिलेल्या क्लिन चिटमुळे स्पष्ट झाले आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.  

कॉर्डिलिया क्रुझवरील ड्रग्ज पार्टीसंदर्भात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला केलेली अटक हा एक पूर्वनियोजित कट होता, हे एनसीबीने आर्यनला दिलेल्या क्लिन चिटमुळे स्पष्ट झाले आहे. एनसीबीच्या माध्यमातून महाराष्ट्र म्हणजे ड्रग्जचे राज्य असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. या सर्व प्रकरणात महाराष्ट्राची देशात प्रचंड बदनामी झाली आहे. कॉर्डिलियासह समीर वानखेडेंनी केलेल्या सर्व कारवायांची स्वतंत्र चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी अतुल लोंढे यांनी केली आहे.   

या ड्रग्ज पार्टी प्रकरणात काहीतरी काळेबेरे आहे, हे सुरुवातीपासूनच दिसून येत होते. केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून महाराष्ट्र अस्थिर करण्याच्या षडयंत्राचाच हा एक भाग होता. कॉर्डिलिया छापेमारीमध्ये भाजपाशी संबंधित लोकांचा थेट एनसीबी कार्यालयात उघड वावर होता. ही कारवाई करण्यासाठी गुजरातपासून कसा सापळा रचला होता याचा मंत्री नबाव मलिक यांनी पर्दाफाश केला होता. नवीन मलिक यांचे आरोप हे खरे होते, हे आज स्पष्ट झाले आहे. आर्यन खानकडे ड्रग्ज सापडले नसतानाही त्याला कोठडीत डांबून ठेवले होते. आता एनसीबीच्या आरोपपत्रात आर्यन खानचे नावही नाही. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी बॉलिवूडसह मुंबई व महाराष्ट्राचे नाव बदनाम करण्याचे काम केले आहे, असा आरोप अतुल लोंढे यांनी केला आहे. 

याचबरोबर, महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी पहिल्या दिवसापासून भारतीय जनता पक्ष काम करत आहे. ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, एनआयए, एनसीबी या केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून बनावट कारवाया करण्यात आल्या. मंत्री नवाब मलिक, माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सुद्धा अशा षडयंत्राचेच बळी ठरले आहेत. अभिनेता सुशांतसिंह, प्रकरणातही राज्य सरकारला अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले गेले पण सत्य अखेर सत्य असते ते लपत नसते हे स्पष्ट झाले आहे. राज्य सरकारने मात्र महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या या महाराष्ट्रद्रोहींची चौकशी करून त्यांना जेलची हवा दाखवावी, असेही अतुल लोंढे म्हणाले.

Web Title: Independent inquiry into all actions taken by Sameer Wankhede, demanded by Congress leader Atul Londhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.