ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १५ : मुसळधार पावसामुळे धोकादायक इमारत कोसळण्याचा धोका वाढला आहे़ दक्षिण मुंबईत अशा काही घटना गेल्या दोन आठवड्यात घडल्या़ तसेच भिवंडीमध्येही दोन इमारत कोसळून निष्पाप जीव बळी गेल्याच्या घटना ताज्या आहेत़ या दुर्घटनांतून वेळीच शहाणपण घेत महापालिका प्रशासनाने शहरा आपत्ती प्रतिसाद पथक स्थापन करण्याची तयारी सुरु केली आहे़२००५ मध्ये मुंबईवर ओढावलेल्या पूरपरिस्थितीनंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाला (एनडीआरएफ) दरवर्षी पावसाळ्यात पाचारण केले जाऊ लागले़ या पथकाची व्यवस्था कायमस्वरुपी मुंबईत करण्यासाठी अंधेरी येथील क्रीडा संकुलात त्यांची व्यवस्था करण्यात आली़ त्याप्रमाणे मुंबईकडे आज एनडीआरएफचे तीन पथक आहेत़ या पथकात एकूण ४५ जवान आहेत़ मात्र हे पथक संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशासाठी असल्याने शहरासाठी स्वतंत्र पथक असल्याची गरज भासू लागली आहे़.
त्यानुसार एनडीआरएफच्या धर्तीवर शहरासाठी आपत्ती प्रतिसाद पथक स्थापन करण्याचा पालिकेचा विचार सुरु आहे़ या पथकामध्ये पाचशे जवान व अधिकाऱ्यांचा समावेश असेल़ ज्यांना पुरातील मदतकार्य, इमारत व दरड कोसळणे आणि इतर मदतकार्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे़ एनडीआरएफकडूनच याबाबत मार्गदर्शन घेतले जाणार असून त्यानुसार सहा महिन्यांत असे पथक मुंबईसाठी तयार ठेवण्याचे पालिकेचे लक्ष्य असल्याचे सुत्रांकडून समजते़.
- पावसाळ्यापूर्व सर्वेक्षणात मुंबई ७४० इमारती अति धोकादायक असल्याचे आढळून आले होते़ २०१५ मध्ये हा आकडा ५४५ होता़- शहरात १४६, पश्चिम उपनगरात ३०८ आणि पूर्व उपनगरात २८६ इमारती अति धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत़स्वतंत्र पथकाची यासाठी गरज राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक मुंबईत असले तरी संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश, पुणे व आसपासच्या शहरांतही या पथकाची मदत आपत्ती काळात घेतली जाते़ त्यामुळे एकाचवेळी दोन ठिकाणी आपत्ती ओढावल्यास या पथकावर विसंबून राहणे मुंबईसाठी धोकादायक ठरेल, असे मत एका अधिकाऱ्याने व्यक्त केले़असे असेल प्रशिक्षणएनडीआरएफ या पथकाला उत्तम प्रशिक्षण दिलेले असते़ त्यामुळे या पथकाच्या मदतीनेच शहरासाठी आपत्ती प्रतिसाद पथक तयार केले जाणार आहे़ यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागेल़ या पथकाला पूर काळातील मदतकार्य, इमारत व दरड कोसळणे तसेच अन्य प्रकारच्या आपत्ती काळातील मदतकार्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे़