छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण; अमित ठाकरे म्हणाले, “अखेर सरकारला जाग आली...!”
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 15:15 IST2025-11-21T15:11:56+5:302025-11-21T15:15:43+5:30
MNS Amit Thackeray News: राजकीय प्रवासात दाखल झालेला पहिला ‘गुन्हा’ असून, २३ नोव्हेंबर रोजी नेरुळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन FIR नोटीस स्वीकारणार आहे, असे अमित ठाकरे यांनी म्हटले आहे.

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण; अमित ठाकरे म्हणाले, “अखेर सरकारला जाग आली...!”
MNS Amit Thackeray News:मनसे नेते अमित ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी नुकतेच नवी मुंबईत एक आंदोलन हाती घेत ४ महिने धूळखात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनावरण केले. अमित ठाकरे यांनी हा पुतळा पाण्याने स्वच्छ करत त्यावर हार घालत अभिवादन केले. यावरून अमित ठाकरे यांच्यासह ७० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर महापालिका प्रशासनाने हा पुतळा झाकून ठेवला. यानंतर अमित ठाकरे यांना पोलिसांनी नोटीस बजावली होती.
नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात येत आहे. याबाबत अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीत यावर प्रतिक्रिया दिली. अखेर सरकारला जाग आली…! गेले चार महिने, नवी मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा धूळ खात होता. हा फक्त एक पुतळा नाही, तर आपल्या महाराष्ट्राची अस्मिता आहे. राजकीय नेत्यांना त्यांच्या खाजगी कार्यक्रमांसाठी वेळ होता, पण महाराजांच्या पुतळ्याच्या लोकार्पणासाठी मात्र त्यांना चार महिने लागले! तेव्हा, महाराष्ट्र सैनिकांनी पुढाकार घेतला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन जनतेला मिळावं… यासाठी जे करावं लागलं, ते अभिमानाने केलं!
राजकीय प्रवासात दाखल झालेला हा पहिला ‘गुन्हा’
आज आनंद वाटतोय! माझ्या सहकाऱ्यांमुळे, अखेर राज्य सरकार जागे झाले आहे आणि आज महाराजांच्या पुतळ्याचे रीतसर लोकार्पण होत आहे. हा विजय आमचा नाही, हा विजय आहे त्या प्रत्येक सामान्य शिवभक्ताचा! आम्हाला कोणतेही श्रेय नको आहे. महाराजांचा सन्मान होतोय, यातच आम्हाला खूप समाधान आहे. महाराजांच्या सन्मानासाठी आम्ही पुतळ्याचे अनावरण केले, म्हणून माझ्यावरही गुन्हा (FIR) दाखल झाला. माझ्या राजकीय प्रवासात दाखल झालेला हा पहिला ‘गुन्हा’, मी आनंदाने स्वीकारला आहे!
२३ नोव्हेंबर रोजी 'एफआयआर'ची नोटीस स्वीकारणार
ती FIR ची नोटीस स्वीकारण्यासाठी मी पोलीस स्टेशनला जाणारच होतो, पण काल नेरुळ पोलिसांनी मला फोन करून नम्र विनंती केली की, "२१ नोव्हेंबर रोजी महाराजांच्या पुतळ्याचे सरकारी अनावरण आहे. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी कृपया तुम्ही तुमची तारीख पुढे ढकला." माझ्यासाठी, महाराजांचा सन्मान आणि लोकार्पणाचा सोहळा हा कुठल्याही राजकीय 'एफआयआर'पेक्षा खूप मोठा आहे. महाराजांच्या सोहळ्यात कोणतीही बाधा येऊ नये, हाच माझा हेतू आहे. त्यामुळे, मी पोलिसांची विनंती मान्य केली असून, मी आता रविवारी, २३ नोव्हेंबर रोजी नेरुळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन 'एफआयआर'ची नोटीस स्वीकारणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा! आज होणारा अनावरण सोहळा निर्विघ्न पार पडावा, हीच आमची सदिच्छा! जय महाराष्ट्र, जय शिवराय!, असे अमित ठाकरे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.