आजच्या डिजिटल युगात महाराष्ट्रातील मुलांना ‘डिजिटल’ कोण करणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 09:49 IST2025-01-15T09:48:43+5:302025-01-15T09:49:15+5:30
राज्यातील ९१ टक्के शाळांत नाही डिजिटल लायब्ररी

आजच्या डिजिटल युगात महाराष्ट्रातील मुलांना ‘डिजिटल’ कोण करणार?
- चंद्रकांत दडस
मुंबई : महाराष्ट्रात १ लाख ८ हजारांहून अधिक शाळा असून, यातील अनेक शाळांत पायाभूत सुविधा नसल्याचे ‘यू-डायस’च्या अहवालात समोर आले आहे. विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा मिळाल्यास त्यांच्या गुणवत्तेत वाढ होते, असे असताना अनेक शाळांत याची वानवा असल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्रातील ३,६६७ शाळांत मुलींसाठी टॉयलेट नसून, मुलांचे टॉयलेट ६,०६७ शाळांत नाही. तर अद्याप ५,८४४ शाळांत वीजच पोहोचलेली नाही. याहून वाईट म्हणजे वीजजोडणी असलेल्या शाळांपैकी तब्बल १३ हजार ८९ शाळांतील विजेचे कनेक्शनच चालू नसल्याचे समोर आले आहे. किचन गार्डन संकल्पना जगभरात वाढत असताना महाराष्ट्रातील ५९,३०२ शाळांत किचन गार्डनच नाही. महाराष्ट्रातील ९८,५२५ शाळांत डिजिटल लायब्ररीच नाही. म्हणजेच ९१ टक्के शाळांत ही डिजिटल लायब्ररी नाही. यात तामिळनाडू, राजस्थान, ओडिशा राज्यांनी आघाडी घेतल्याचे समोर येते.
आम्हाला खेळण्यासाठी मैदान देता का मैदान?
देशातील १४ लाख ७१ हजार शाळा असून, त्यातील केवळ ८२.३७ टक्के शाळांमध्ये मुलांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध आहे. महाराष्ट्रातील १ लाख शाळांपैकी ६ हजार शाळांमध्ये मैदान उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. शाळांमध्ये मैदान असलेल्या राज्यांत तामिळनाडू, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा, पंजाब ही राज्ये आघाडीवर आहेत.
कोणती सुविधा किती शाळांमध्ये उपलब्ध नाही ?
ग्रंथालय १,६३९
मैदान ५,९१५
डिजिटल ग्रंथालय ९८,५२५
किचन गार्डन ५९,३०२
मुलींसाठी टॉयलेट ३,६६७
दिव्यांग मुलींचे टॉयलेट ६,९९८
मुलांचे टॉयलेट ६,०६७
वीजजोडणी ५,८४४
वीज चालू नाही १३,०८९
सोलर पॅनेल ८९,२९३