पुणे/मुंबई - काँग्रेस पक्ष हा देशातील सर्वात जुना व अनुभवी पक्ष असून काँग्रेस विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. काँग्रेसकडे सक्षम व समर्थ नेतृत्व व कार्यकर्ते आहेत. तर भाजपा दुसऱ्या पक्षातील कार्यकर्ते खाणारी चेटकीण आहे. मुख्यमंत्र्याच्या आजूबाजूला व मंत्रीमंडळाकडे पाहिले तर काँग्रेसचेच लोक दिसतात. एक कोटी सदस्य व मोदींसारखे नेतृत्व आहे म्हणतात पण ते नेतृत्व सक्षम नसून पोकळ आहे म्हणूनच त्यांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना घ्यावे लागत असून, ही शोकांतिका आहे. काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजपाच काँग्रेसयुक्त झाला, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेचे खडकवासला येथे उद्घाटन झाले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार,विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य व माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, कुणाल चौधरी, यू बी. व्यंकटेश, उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड. गणेश पाटील, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.
या कार्यशाळेबद्दल प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली असून प्रत्येक कार्यकर्ता प्रशिक्षित असावा हा त्यामागचा उद्देश आहे. यात orientation, introduction, आणि interaction ही त्रिसुत्री असणार आहे. दोन दिवस वरिष्ठ नेते व विविध विषयातील तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेत आगामी काळातील कार्यक्रमांची रुपरेषा ठरवली जाईल व कृती कार्यक्रम आखण्यात येणार आहे. निवडणुकीपुरते जागे व्हायचे आणि निवडणुकीनंतर सर्व संपले असा काँग्रेसचा विचार नसून काँग्रेस हा नितंरत चालणारा व स्वराज्याच्या दिशेने कुच करणार पक्ष आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.