प्रमोशन मिळाले अन् अवघ्या ३६ तासांत झाले रिटायर; औटघटकेचा ठरला पदोन्नतीचा आनंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 09:16 IST2025-07-12T09:16:02+5:302025-07-12T09:16:24+5:30
आता जुलै महिन्यात आणखी सहा पोलिस निरीक्षक सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांच्याही पदोन्नतीचे आदेश महिनाअखेर काढले जाण्याची शक्यता वर्तविली जाते.

प्रमोशन मिळाले अन् अवघ्या ३६ तासांत झाले रिटायर; औटघटकेचा ठरला पदोन्नतीचा आनंद
नांदेड : राज्य पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीच्या कासवगतीबाबत नेहमीच ओरड ऐकायला मिळते. अखेरच्या क्षणी पदोन्नती दिली जाते. ती अवघे २४ ते ३६ तासच उपभोगायला मिळते. त्यामुळे पदोन्नतीचा हा आनंद औटघटकेचा ठरतो.
राज्यातील २१५ पोलिस निरीक्षकांच्या पदोन्नतीची पात्रता यादी जारी केली गेली. त्यांना पोलिस उपअधीक्षक तथा सहायक पोलिस आयुक्त पदावर बढती देण्याचे निश्चित झाले. २७ मे २०२५ रोजी या २१५ पोलिस अधिकाऱ्यांना पसंतीचा महसुली संवर्ग मागितला गेला. त्यामुळे दोन-चार दिवसांत पदोन्नतीची यादी जारी होईल, अशी सर्वांनाच अपेक्षा होती. प्रत्यक्षात जुलै अर्ध्यावर आला तरी या पदोन्नतीच्या यादीला मुहूर्त सापडलेला नाही.
२७ जूनला ऑर्डर, ३० जूनला सेवानिवृत्त
३० जूनला अशोक खोत (बृहन्मुंबई), रामकृष्ण महल्ले (वाशिम), दौलत जाधव (अहिल्यानगर), संदीप मोरे (मुंबई) हे चार पोलिस अधिकारी सेवानिवृत्त होणार म्हणून घाईघाईने २७ जूनला त्यांच्या पदोन्नतीचे आदेश काढले गेले. २८ ला शनिवार, तर २९ ला रविवार होता. त्यामुळे ३० जूनला सकाळी पोलिस उपअधीक्षक म्हणून त्यांनी प्रत्यक्ष काम केले आणि सायंकाळी सेवानिवृत्त झाले. आता जुलै महिन्यात आणखी सहा पोलिस निरीक्षक सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांच्याही पदोन्नतीचे आदेश महिनाअखेर काढले जाण्याची शक्यता वर्तविली जाते.