रुग्णांना ‘एमआरपी’चे इंजेक्शन! १५ रुपयांना मिळणारी वस्तू १६५ रुपयांना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 06:10 IST2025-02-12T06:10:25+5:302025-02-12T06:10:46+5:30
रुग्णालयांशी संलग्न औषधी दुकानांद्वारा ३८ रुपये खरेदी किंमत असलेली वस्तू एमआरपी दराने थेट ३१० रुपयांना विकली जाते

रुग्णांना ‘एमआरपी’चे इंजेक्शन! १५ रुपयांना मिळणारी वस्तू १६५ रुपयांना
सचिन राऊत
अकोला - रुग्णालयांशी संलग्न असलेल्या औषधी दुकानांद्वारा, रुग्णालयात दाखल रुग्णावरील उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय साहित्याची विक्री करताना, कुटुंबीयांच्या खिशावर अक्षरशः ‘दरोडा’च घालण्यात येत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
युरिन बॅग, कॅथेटर, आयव्ही सेट, आयव्ही कॅथेटर, आयव्ही कॅन्युला, नेब्युलायझरसाठी लागणारे मास्क, पीडिया ड्रीप, बीटी सेट, सर्जिकल कापूस यांसारख्या वैद्यकीय साहित्याची एमआरपी मूळ खरेदी किमतीच्या जवळपास ५ ते १० पट आहे.
बाहेर स्वस्त, आत महाग
रुग्णालयांशी संलग्न औषधी दुकानांद्वारा ३८ रुपये खरेदी किंमत असलेली वस्तू एमआरपी दराने थेट ३१० रुपयांना विकली जाते, तर तीच वस्तू बाहेरील औषधी दुकानांतून घेतल्यास केवळ ६० ते ७० रुपयांत मिळते.
औषध व्यावसायिकांनी किती नफा कमवावा, हे त्यांच्यावर अवलंबून आहे. एमआरपी जास्त असल्याने, अधिक नफ्याचा उद्देश असतो, अशी माहिती आहे.
डॉ. गजानन घिरके, औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन
युरिन बॅग, आयव्ही सेट एमआरपी दरातच विकले जात आहेत. औषध व्यावसायिक औषध आणि सर्जिकल साहित्य त्यांना परवडेल अशा दरातच विकत आहेत.- मंगेश गुगूल, अध्यक्ष, केमिस्ट, ड्रगिस्ट असोसिएशन, अकोला
साहित्य | MRP | खरेदी | बाजारभाव | रूग्णालय |
युरिन बॅग | ३१६ | ३८ ते ३९ | ६० ते ७० | ३१० |
कॅथेटर | ७४३ | १३० | २०० ते २१० | ७४० |
आयव्ही सेट | १८० | १४ | ३० ते ४० | १८० |
आयव्ही कॅथेटर | १६८ | १५ | ४५ ते ५० | १६५ |
आयव्ही कॅन्युला | १८७ | १४.५० | ४० ते ५० | १८० |
नेब्युलायझर मास्क | ५७२ | ४७ | ८० ते ९० | ५७० |
पीडिया ड्रीप | २८० | ४० | ६० ते ७० | २८० |
बीटी सेट | १७९ | १६ | ३० ते ३५ | १७५ |