ओबीसी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी: राज्यात ५४ वसतीगृहे सुरू, सरकार आणखी १८ उभारणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 22:06 IST2025-03-05T22:05:38+5:302025-03-05T22:06:02+5:30
ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणारे विद्यावेतन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे.

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी: राज्यात ५४ वसतीगृहे सुरू, सरकार आणखी १८ उभारणार
Maharashtra Government: "ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राज्यात वर्षभरात ५४ वसतीगृहे सुरु करण्यात आली आहेत, तर आणखी १८ वसतिगृहे येत्या जूनअखेर सुरू होतील," अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधानपरिषदेत दिली. वर्षभरात ५४ ओबीसी वसतीगृह सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री सावे यांचे सभागृहात अभिनंदन केले.
विधानपरिषदेत सदस्य अभिजीत वंजारी यांनी ओबीसी वसतिगृह आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरावेळी ते बोलत होते.
मंत्री सावे म्हणाले की, "राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रस्तावित ७२ वसतिगृहांपैकी ५४ वसतिगृहे सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये २६ मुलांची आणि २८ मुलींची वसतीगृहे आहेत. उर्वरित वसतीगृहे या शैक्षणिक वर्षांपासून सुरु होतील. याशिवाय, ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणारे विद्यावेतन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. मुंबई, आणि महानगर परिरसरातील इमारतीसाठी शासनाने भाडे वाढवून देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे उर्वरित १८ वसतिगृहे येत्या शैक्षणिक वर्षांपासून म्हणजेच जून-जुलैमध्ये सुरू होतील. सर्व वसतिगृहे स्वमालकीची असावीत यासाठीही विभाग प्रयत्नशील आहे."
दरम्यान, "वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबवण्यात येत आहे. या योजनेचा निधी थेट विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. यंदाच्या वर्षी बँक खात्यांमधील काही त्रुटीमुळे हा निधी वितरणास वेळ लागला आहे. परंतू पुढील शैक्षणिक वर्षापासून हा निधी वेळेत विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल," अशी माहितीही सावे यांनी दिली आहे.