वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी; जुन्या गाड्यांना बसवावी लागणार 'ही' नवी नंबर प्लेट, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 10:53 IST2025-02-08T10:46:42+5:302025-02-08T10:53:03+5:30
वाहनधारकांनी पोर्टलवर बुकिंग करुन अपॉईंटमेंट घ्यावी आणि नंबर प्लेट बसवून घेण्यात यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी; जुन्या गाड्यांना बसवावी लागणार 'ही' नवी नंबर प्लेट, कारण...
Maharashtra Government: केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ आणि केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाच्या नियमानुसार १ एप्रिल २०१९ पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना ‘ हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ (उच्च सुरक्षित नोंदणी क्रमांक पाटी) बसवण्याची तरतूद आहे. यामुळे वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटवणे शक्य होणार आहे.
राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी उत्पादित झालेल्या जुन्या नोंदणीकृत वाहनांना ही नंबर प्लेट बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबई मध्य प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व वाहनधारकांनी त्यांच्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवावी, असं आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आलं आहे.
राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातूनही सर्व वाहनांना ही नंबर प्लेट बसवणे अत्यावश्यक असून १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांनाही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयाच्या कार्यक्षेत्राकरिता रियल मेझॉन इंडिया लिमिटेड ही एजंसी निश्चित करण्यात आली आहे. ही नंबर प्लेट बसविण्याकरिता बुकींग पोर्टल https://hsrpmhzone2.in कार्यान्वित करण्यात आले आहे. वाहनधारकांनी या पोर्टलवर बुकिंग करुन अपॉईंटमेंट घ्यावी आणि नंबर प्लेट बसवून घेण्यात यावी.
वाहन धारक प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील नोंदणी धारक नसला, तरी काही कामानिमित्त या कार्यक्षेत्रामध्ये वाहन वापरत असेल तरी देखील वाहनास ही नंबर प्लेट बसवणे आवश्यक आहे. वाहनधारकांना त्यांच्या वाहनांवर नंबर प्लेट बसवण्यासंदर्भात काही तक्रार असल्यास संबंधीत सेवापुरवठा धारकांच्या पोर्टलवर तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) कार्यालयात तक्रार दाखल करावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.