राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय: परराज्यातील माल वाहतुकदारांची आता फक्त तापमान तपासणी होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 18:15 IST2021-05-15T18:10:13+5:302021-05-15T18:15:50+5:30
माल वाहतुकदारांना मोठा दिलासा; कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र बाळगण्यातून सवलत

राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय: परराज्यातील माल वाहतुकदारांची आता फक्त तापमान तपासणी होणार
पिंपरी : परराज्यातील माल वाहतुकदारांच्या तापमानाची तपासणी केल्यानंतरच त्यांना राज्यात प्रवेश देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच वाहनात चालक, क्लिनर आणि मदतनीस या व्यक्तिरिक्त अन्य व्यक्तीस मनाई असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे माल वाहतुकदार आणि उद्योगांनी सुटकेचा निःश्वास घेतला आहे.
टाळेबंदीच्या सुधारीत नियमांतर्गत परराज्यातून येणाऱ्या मालवाहतुकदार आणि क्लिनरला कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याचे प्रमाणपत्र दाखविणे बंधनकारक केले होते. प्रवेश करण्यापूर्वी किमान अठ्ठेचाळीस तास अशी चाचणी करणे बंधनकारक होते. तसेच हा अहवाल सात दिवस ग्राह्य धरण्यात येणार होता.
प्रत्येक फेरीसाठी अशी चाचणी करणे शक्य नाही. आपणच तपासणी नाक्यावर चाचणीची सुविधा निर्माण करावी अशी मागणी विविध माल वाहतूक संघटनांकडून करण्यात येत होती. त्यातच राज्याच्या सीमेवर कोरोना चाचणी प्रमाण पत्राची तपासणी सुरू झाल्यानंतर वाहनांच्या रांगा लागल्या. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहनेही त्यात होती. ही बाब सरकारी प्रतिनिधींच्या निदर्शनास आणल्या नंतर शनिवारी (दि १५) तातडीने सुधारीत आदेश देण्यात आला.
त्यानुसार माल वाहतूक करणाऱ्या वाहन बरोबर चालक, क्लिनर आणि एक मदतनीस यांना परवानगी देण्यात आली. त्यांच्या शरीराचे तापमान तपासून राज्यात प्रवेश दिला जाईल. त्याच बरोबर त्यांनी आरोग्य सेतू अँप मोबाईलवर ठेवणे आवशयक असेल. एखादी व्यक्तीस कोरोनाची लक्षणे दिसून आल्यास त्यांना तातडीने जवळच्या कोविड केंद्रात भरती केले जाईल, असे महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने काढलेल्या सुधारीत आदेशात म्हटले आहे.