सहा फुटांच्या मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन शक्य; मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 08:27 IST2025-07-25T08:27:27+5:302025-07-25T08:27:41+5:30
मुंबई महापालिकेच्या कृत्रिम तलावांची उंची पाच फूट असली तरी त्यांत सहा फुटांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन करणे शक्य होणार आहे, असे पालिकेच्या एका संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

सहा फुटांच्या मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन शक्य; मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा दावा
मुंबई : मुंबई महापालिकेच्या कृत्रिम तलावांची उंची पाच फूट असली तरी त्यांत सहा फुटांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन करणे शक्य होणार आहे, असे पालिकेच्या एका संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
साधारणपणे पाच फूट उंचीच्या मूर्ती विसर्जित होऊ शकतील अशा स्वरूपाचे कृत्रिम तलाव बांधण्यात येतात. त्यामुळे सहा फूट उंचीच्या मूर्तीचे विसर्जन त्यांत होऊ शकेल का, अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र, सहा फुटांच्या उंचीच्या मूर्तीचे विसर्जन शक्य आहे, असे पालिकेतील एका अधिकाऱ्याने सांगितले.
सहा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्तींचे विसर्जन समुद्रात करण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. समुद्रात विसर्जनासाठी करावी लागणारी सगळी व्यवस्था पालिकेकडे असल्याने विसर्जनावेळी काहीही अडचण येणार नाही. सहा फुटांवरील प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींचे विसर्जन समुद्रात करण्यास परवानगी मिळाली नसती तर मोठा पेच निर्माण झाला असता. माघी गणेशोत्सवाच्या वेळी असा पेच निर्माण झाला होता. काही मंडळांच्या जास्त उंचीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यास पालिकेने परवानगी नाकारल्यामुळे त्या मूर्ती मंडळांना पुन्हा मंडपात ठेवाव्या लागल्या होत्या.
सरकारच्या भूमिकेकडे लक्ष
न्यायालयाच्या निर्णयानुसार पीओपीच्या मूर्तींना माघी गणेशोत्सवापर्यंत परवानगी आहे. त्यामुळे पुढील वर्षी पुन्हा या मूर्तींचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो. त्यामुळे या संदर्भात राज्य सरकार आणि न्यायालय काय भूमिका घेते याकडे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासह बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीचेही लक्ष लागले आहे.
गणेशोत्सव समितीने मानले आभार
सहा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तींचे समुद्रात विसर्जन करण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिल्याने हजारो सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, विसर्जनास परवानगी दिल्याने बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने न्यायालय आणि सरकारचे आभार मानले आहेत.
जेथे कृत्रिम तलावात विसर्जन करणे शक्य नाही, अशा ठिकाणी समुद्र किंवा नैसर्गिक जलप्रवाहात विसर्जन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. फक्त विसर्जन काळात नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. दरवर्षी सुमारे १२ फुटांपर्यंतच्या मूर्तींचे विसर्जन सार्वजनिक मंडळांकडून होते. त्यामुळे या निर्णयामुळे विसर्जन व्यवस्थापन सुलभ होणार असून, पर्यावरणाच्या दृष्टीनेही योग्य पावले उचलली जातील, असा विश्वास समितीचे अध्यक्ष नरेंद्र दहीबावकर यांनी व्यक्त केला.