मला माफी असावी...; CA परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या युवतीचं शरद पवारांना भावूक पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 13:37 IST2021-09-30T13:36:10+5:302021-09-30T13:37:01+5:30
हे पत्र आज साहेबांच्या टपालात मला मिळाले आणि वाचून समाधान वाटले. सोनाली सारख्या गुणवंत मुलीचे स्वप्न साकारले याचा आनंद वाटतो असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मला माफी असावी...; CA परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या युवतीचं शरद पवारांना भावूक पत्र
मुंबई – शिक्षणासाठी आर्थिक मदत करून प्रोत्साहन दिल्याप्रकरणी ठाण्यातील युवतीनं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून आभार व्यक्त केले आहेत. या युवतीनं CA ची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तिच्या या यशाच्या वाट्यात शरद पवारांचा(Sharad Pawar) मोठा वाटा असल्याचं युवतीने सांगितले आहे. परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर युवतीनं पवारांना लिहिलेलं पत्र सोशल मीडियात व्हायरल झालं आहे.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर हे पत्र शेअर केलं आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ठाणे येथील सोनाली ही विद्यार्थिनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीचा सामना करुन सीए-आयपीसीसी ही परीक्षा उत्तीर्ण झाली. सध्या ती एका सीए फर्ममध्ये काम करते. बारावीनंतर तिनं आपल्या आर्थिक परिस्थितीची माहिती देऊन सीए होण्याची इच्छा असणारे एक पत्र पवार साहेबांना लिहिलं होतं. यानंतर तिला शिक्षणासाठी मदत करण्यात आली होती. आजही तिने साहेबांना पत्र लिहून आपले सीए होण्याचे स्वप्न साकार झाल्याचे कळविले आहे.हे पत्र आज साहेबांच्या टपालात मला मिळाले आणि वाचून समाधान वाटले. सोनाली सारख्या गुणवंत मुलीचे स्वप्न साकारले याचा आनंद वाटतो. तिचे व तिच्या आई-वडीलांचे या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन. तिला पुढील कारकिर्दीसाठी खुप खुप शुभेच्छा अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
या पत्रात काय म्हटलंय?
वंदनीय, पवार साहेब यांना सोनाली यांच्याकडून सप्रेम नमस्कार, मी एक अतिशय सामान्य परिस्थितीत असणाऱ्या घरातून आहे. माझे वडील रिक्षाचालक असून आई गृहिणी आहे. मी १२ वी इयत्तेनंतर चार्टर्ड अकाऊंटेट या कोर्ससाठी प्रवेश घेतला होता. CA-CPT ची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी मी पुण्यात राहायचं ठरवलं. त्यावेळी मी तुम्हाला आर्थिक सहाय्यता करण्याबद्दल एक पत्र लिहिलं होतं.
पुण्याला आल्यानंतर तुम्ही मला राहण्याची आणि खाण्यापिण्याची मोफत सुविधा उपलब्ध करून दिली. आपल्या कर्वेनगर येथील हॉस्टेलमध्ये माझ्या ट्यूशनचीदेखील फी भरण्यास मदत केली. मला माफी असावी की, CA-IPCC ही परीक्षा मला पहिल्या प्रयत्नात सफल करता आली नाही. त्यामुळे मी परत आई वडिलांकडे परतले. कारण मला माझी लाज वाटली की मी पहिल्या प्रयत्नात यशस्वी होऊ शकले नाही.
पण त्यानंतर मी दुसऱ्या प्रयत्नात CA IPCC परीक्षा पास झाली. एका उत्तम सीए फर्ममध्ये मी माझी इंटर्नशिप ३ वर्ष पूर्ण केली आणि अखेर मी CA फायनल परीक्षा दिली. जानेवारी २०२१ मध्ये पहिला ग्रुप आणि जुलै २०२१ मध्ये दुसरा ग्रुप मी पास झाली. १३ सप्टेंबर २०२१ रोजी माझा निकाल लागला आणि आता मी CA सोनाली... आहे. मला अगदी चांगल्या ठिकाणी जॉब भेटणार असून माझ्या घरची अनेक वर्षापासून चालत असलेली गरिबी आणि संघर्ष लवकरच संपणार आहेत.
या सगळ्या प्रवासात सर तुमच्या मदतीचा खूप मोठा वाटा आहे. मी माझ्या उभ्या आयुष्यात तो कधीही फेडू शकत नाही. मला आठवणीत आहे की, तुम्ही मला बोलले होते की पास झाल्यावरच पुढच्यावेळी बोलू, आज मी चार्टर्ड अकाऊंटेट झाले आहे. हे मला तुम्हाला कळवताना अतिशय आनंद होत आहे. तुमचे अगदी मनापासून आभार आहेत. हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं.
आपली विद्यार्थिनी
सोनाली...