'...म्हणून मी माझे उद्याचे पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करतोय'; बाळासाहेब थोरात यांचं ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 23:25 IST2023-11-01T23:23:28+5:302023-11-01T23:25:01+5:30
मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे.

'...म्हणून मी माझे उद्याचे पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करतोय'; बाळासाहेब थोरात यांचं ट्विट
मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टीमेटम दिला आहे. मनोज जरांगेंच्या आंदोलनाला राज्यातील जवळपास सर्वंच मंत्री, आमदार, खासदारांनी पाठिंबा दर्शवला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील मनोज जरांगे यांच्या लढ्याला समर्थन दिले आहे.
बाळासाहेब थोरात ट्विट करत म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे दुसऱ्या टप्प्यातील उपोषण सुरू आहे, या लढ्याला प्रथमपासूनच मी समर्थन दिलेले आहे, मराठा समाज बांधवांच्या भावनेचा आदर करत आणि मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या लढाईला बळ मिळावे म्हणून मी माझे उद्याचे पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करत असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. विघ्नहर सहकारी साखर कारखाना, जुन्नर आणि सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात सहकारी साखर कारखाना, संगमनेर या दोनही कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभास मी उपस्थित राहणार नाही, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे दुसऱ्या टप्प्यातील उपोषण सुरू आहे, या लढ्याला प्रथमपासूनच मी समर्थन दिलेले आहे, मराठा समाज बांधवांच्या भावनेचा आदर करत आणि मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या लढाईला बळ मिळावे म्हणून मी माझे उद्याचे पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द…
— Balasaheb Thorat (@bb_thorat) November 1, 2023
तत्पूर्वी, आमचे आंदोलन शांततेत सुरू आहे. परंतु, सरकार खोट्या केसेस दाखल करीत आहे. केसेसला घाबरून आरक्षणाच्या लढ्यातून मागे सरकू नये. आरक्षणासाठी सर्व पुरावे आहेत. तरीही जाणून बुजून आरक्षण दिले जात नाही. आता आम्हाला लढावे लागेल. होणाऱ्या परिणामांना सरकार जबाबदार असेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. आम्ही आरक्षणासाठी शांततेत लढा देणार आहोत. सरकारने वातावरण दूषित करू नये. आता माझे बोलणे कधी बंद होईल, हेच मला माहिती नाही. त्यामुळे शासनाने वेळ कशासाठी हवा, किती हवा, सरसकट मराठा समाजाला आरक्षण देणार का हे इथं येवून सांगावे. आम्हाला त्यांचे म्हणणे योग्य वाटले तर आम्ही वेळ देवू अन्यथा एक तासही देणार नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले.
सहा ते सात टप्प्यात आंदोलन
मराठा आरक्षणाचा लढा शांततेत लढायचा आहे. एकूण सहा ते सात टप्प्यात आपले आंदोलन होणार आहे. शेवटच्या टप्प्यापूर्वीच आपल्याला आरक्षण मिळेल. त्यामुळे युवकांनी आत्महत्या करू नयेत. उद्रेक करू नये, शांततेत आंदोलन करावे, असे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केले.