Chitra Wagh News: दिशा सालियन प्रकरणावरून भाजप-शिवसेनेच्या आमदारांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंना कोंडीत पकडलं आहे. त्यांच्या अटकेची मागणीही केली गेली आहे. या मुद्दा विधान परिषदेत चर्चेला आल्यानंतर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अनिल परब यांनी संजय राठोड प्रकरणाचा उल्लेख करत आमदार चित्रा वाघ यांना डिवचलं. त्यानंतर चित्रा वाघ यांनी अनिल परबांनाउद्धव ठाकरेंचं उल्लेख करत उत्तर दिले. विधान परिषदेतील या भाषणाची चर्चा होत असतानाच आता चित्रा वाघ यांनी एक्स वर एक पोस्ट शेअर केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत आदित्य ठाकरेंचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे राजकारण तापले असून, विधिमंडळाच्या अधिवेशनातही याचे पडसाद उमटले. दरम्यान, याच मुद्द्यावरून आमदार चित्रा वाघ आणि आमदार अनिल परब यांच्यात खडाजंगी झाली.
दिशा सालियन प्रकरणावर बोलताना अनिल परब यांनी संजय राठोड यांच्या प्रकरणावर बोट ठेवले. त्यामुळे चित्रा वाघ यांचा पारा चढला आणि त्यांनी अनिल परब यांना प्रत्युत्तर दिले.
आता चित्रा वाघ सोशल मीडियावर काय पोस्ट केलीये?
"फक्त भाषणात नाही तर प्रत्यक्षात दाखवून द्यावं लागत स्त्री काय आहे. फार हलक्यात घेतात महिलांना… काहीही आम्ही बोलू शकतो ही त्यांची मानसिकता आज ठेचली आणि नादी लागलात आमच्या तर रोजच ठेचणार", असे चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
"पण काही सटरफटर वटवाघूळ फडफडायचे सोडत नाही, असो स्वभाव एकेकाचा. कुणाच्या लेकराबाळांवर मला बोलतांना त्रास होतोय पण आमच्याबद्दल बोलतांना मात्र सगळचं ताळतंत्र सोडलेलं आहे म्हणून एकच प्रश्न जिचा नवरा सतत पत्रकार परिषद घेऊन लेकराची DNA चाचणी करा म्हणून मागणी करा म्हणतोय, काय बोलायचं या कार्यकर्तृत्वाच्या आलेखाला. तळ टिप - कीव वाटते प्रगाढ पोपट पंडिताची स्वत:मध्ये हिंमत नाही म्हणून असल्या सटरफटरांना पुढे करावं लागतयं", अशी टीका चित्रा वाघ म्हणाल्या.
उद्धव ठाकरेंनी क्लीन चिट दिलीये -चित्रा वाघ
विधान परिषदेमध्ये अनिल परब यांना उत्तर देताना चित्रा वाघ यांनी दावा केला की, उद्धव ठाकरे यांनीच संजय राठोड यांना क्लीन चिट दिली होती. "संजय राठोड प्रकरणात मला जे वाटलं, ते मी केलं. जे दिसलं, जे पुरावे आले, त्यावर मी लढले. तुम्ही तर तोंड शिवून बसला होतात. तुम्ही शेपूट घातले होते."
"अनिल परब हिंमत आहे का, तुमच्या उद्धव ठाकरेंना विचारायची. त्यांनी (उद्धव ठाकरे) त्यांना (संजय राठोड) क्लीन चिट दिली. अनिल परब हे फार हुशार आहेत. त्यांची हुशारी मी कधी बघितली नाही. आज संजय राठोड का मंत्रिमंडळात आहेत, याचे उत्तर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेलं आहे. हिंमत असेल, तर उद्धव ठाकरेंना विचारा की, का क्लीन चिट दिली?", असा सवाल चित्रा वाघांनी अनिल परबांनी विधान परिषदेत केला.