"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 00:11 IST2025-07-21T00:11:07+5:302025-07-21T00:11:28+5:30
Latur News: विजय घाटगे यांनी मारहाणीनंतर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत अजित पवार यांना डिवचले आहे. आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर याचा हिशोब होईल, असा इशारा घाडगे यांनी दिला आहे.

"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया
राज्य सरकारमधील मंत्री माणिकराव कोकाटे हे विधिमंडळात रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी या मागणीसाठी छावा संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी लातूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवेदन देत त्यांच्यावर पत्ते फेकले होते. यावेळी झालेल्या बाचाबाचीमधून अजित पवार गटाचे सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या विजय घाडगे यांना मारहाण केली होती. त्यानंतर आता विजय घाटगे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत अजित पवार यांना डिवचले आहे. आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर याचा हिशोब होईल, असा इशारा घाडगे यांनी दिला आहे.
या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना विजय घाडगे म्हणाले की, ‘आम्ही सनदशीर मार्गाने राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांकडे कृषिमंत्र्यांच्या विरोधात निवेदन दिले. विधानसभेच्या दालनात पत्ते खेळत असलेल्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली. मात्र, राष्ट्रवादीने आमच्यावर गुंड लावून दिले. त्यांच्याकडून आम्हाला मारहाण झाली.
ते पुढे म्हणाले की, अजित दादा तुमच्या कार्यकर्त्यांनी आज आमच्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली आहे. छावा म्हणजे शेतकऱ्याची पोरं आहेत. आमच्या निवेदनाला तुम्ही लाथा बुक्क्यांनी प्रतिसाद देणार असाल तर याचा हिशोब होईल, छावा संघटना आपल्या स्टाईलने प्रत्युत्तर देईल, त्याची राजकीय किंमत तुम्हाला चुकवावी लागेल, असा इशारा घाडगे यांनी अजित पवार गटाला दिला आहे.