मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 13:49 IST2025-07-29T13:46:20+5:302025-07-29T13:49:32+5:30
MNS And Thackeray Group: राज-उद्धव आगामी मुंबई पालिका निवडणुकीत एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असले तरी दोन्ही बाजूंच्या संभाव्य उमेदवारांमध्ये धाकधूकही निर्माण झाली आहे.

मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
MNS And Thackeray Group: आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात अनेकविध गोष्टी घडत आहेत. दर आठ-पंधरा दिवसांनी होणारे शिंदेसेनेतील प्रवेश गेल्या काही दिवसांपासून थांबले असल्याची चर्चा आहे. विशेषतः मुंबईतील माजी नगरसेवकांची पक्ष भरती थांबली असून, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या शक्यतेमुळे मुंबईतील पक्षप्रवेशांना ओहोटी लागल्याची चर्चा सुरू आहे. परंतु, आता वेगळीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकांची घोषणा होताच सुरवातीला इतर पक्षातील अनेक माजी नगरसेवक आणि इच्छुक उमेवारांच्या रांगा शिंदेगटातील पक्षप्रवेशासाठी वाढल्याचे दिसत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून हे पक्षप्रवेश थंडावल्याचे चित्र आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी मनसे-उद्धवसेना एकत्रित आल्याची घोषणा केव्हा होणार, आणि त्यानंतर काय रणनीती ठरवायची, याकडे आयाराम-गयारामांचे लक्ष लागले आहे. मनसे आणि उद्धवसेना युती झाल्यास शिंदे गटात गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार, यावरून आता कार्यकर्ते, नेते यांच्यात संभ्रम निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे.
उमेदवारांची धाकधूक वाढली
राज-उद्धव आगामी मुंबई पालिका निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, मात्र त्याच वेळेस नगरसेवकपदासाठी इच्छुक असलेल्या दोन्ही बाजूंच्या संभाव्य उमेदवारांमध्ये धाकधूकही निर्माण झाली आहे. उद्धवसेनेचे जे माजी नगरसेवक शिंदेसेनेत गेले आहेत त्या जागेवर मनसेचा दावा राहणार की उद्धवसेनेचा? याविषयी संभ्रम आहे. मागील निवडणुकीत मनसेचे फक्त सात नगरसेवक निवडून आले होते. त्याचप्रमाणे दुसऱ्या क्रमांकावर त्यांचे फार कमी उमेदवार होते. त्यामुळे आपल्या वाट्याला नेमक्या किती जागा येणार याविषयी मनसैनिक चिंतेत आहेत, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात आहे.
दरम्यान, सध्या मराठीच्या मुद्द्यावर का होईना, ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे ठाकरे यांच्या पक्षातून शिंदे यांच्या पक्षात गेलेल्या माजी नगरसेवकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. ठाकरे बंधूच्या एकत्र येण्यामुळे आधीच शिंदे यांच्या पक्षातील माजी नगरसेवकांमध्ये अस्वस्थता असताना आता शिंदे यांच्या पक्षातील आमदार वादात सापडले आहेत. राजकीय कोंडी होऊ लागल्यामुळे ही अस्वस्थता वाढू लागली असल्याची कुजबुज सुरू आहे. महापालिका निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून पालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधुंची युती झाली तर त्याचा सर्वाधिक फटका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसू शकतो, असा अंदाज आहे.