फॉर्म अपात्र ठरल्यास आधीचे पैसे दंडासह वसूल करणार?; चर्चेवर आदिती तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 13:27 IST2025-01-18T13:27:49+5:302025-01-18T13:27:49+5:30

निकषात न बसणाऱ्या महिलांकडून दंडासह रक्कम वसूल केली जाईल, अशी चर्चा रंगू लागली आहे.

If the form is found to be ineligible will the previous money be recovered along with the penalty Aditi Tatkare gave clarification on ladki bahin yojna | फॉर्म अपात्र ठरल्यास आधीचे पैसे दंडासह वसूल करणार?; चर्चेवर आदिती तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण

फॉर्म अपात्र ठरल्यास आधीचे पैसे दंडासह वसूल करणार?; चर्चेवर आदिती तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण

Aditi Tatkare: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून निकषात न बसणाऱ्या अनेक महिलांनी लाभ घेतल्याचं समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून सदर लाभार्थी महिलांकडून दंडासह रक्कम वसूल केली जाईल, अशी चर्चा रंगू लागल्याने अनेक महिलांनी या योजनेतून बाहेर पडण्यासाठी अर्ज केले आहेत. मात्र निकषात न बसणाऱ्या महिलांचा अर्ज बाद होणार असला तरी त्यांना आधी दिलेली रक्कम वसूल करण्याचा सरकारचा विचार नाही, असं स्पष्टीकरण महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलं आहे.

सरकारकडून रक्कम वसूल करण्याच्या भीतीने राज्यातील ४ हजार महिलांनी या योजनेतून आपलं नाव कमी केलं जावं, यासाठी अर्ज केल्याची माहिती आहे. परंतु सरकार ज्या महिला निकषात बसत नाहीत त्यांना लाडकी बहीण योजनेतून पैसे देणं आपण बंद करणार आहे. असं असलं तरी त्यांच्याकडून आधी दिलेली रक्कम परत घेण्यात येणार नसल्याचा खुलासा आदिती तटकरे यांनी केला आहे.

निधी वितरीत करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता येत्या २६ जानेवारीपूर्वी दिला जाणार आहे. या योजनेच्या जानेवारी महिन्याचा हप्ता देण्यासाठी ३६९० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने गुरुवारी मान्यता दिली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यात आला आहे. त्यानंतर जानेवारी महिन्याचा हप्ता अद्याप या लाभार्थीना मिळाला नसून हा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचे लक्ष आहे.

सहा महिन्यांपूर्वी, जुलैमध्ये राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात महायुती सरकारने 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची' घोषणा केली. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या २१ ते ६५ या वयोगटातील २ कोटी ४६ लाख महिलांना आतापर्यंत दरमहा १५०० रुपये देण्यात येतात. डिसेंबर महिन्याचे पैसेही २ कोटींहून अधिक पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले.

 

Web Title: If the form is found to be ineligible will the previous money be recovered along with the penalty Aditi Tatkare gave clarification on ladki bahin yojna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.