गेल्या काही काळापासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरु होत्या. परंतू, दोन दिवसांपूर्वीच राज ठाकरेंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली, यानंतर एकनाथ शिंदेंचे मंत्री उदय सामंत यांनी राज यांची भेट घेतली यामुळे नेमके वरच्या पातळीवर काय राजकारण सुरु आहे, याचा अंदाज येत नाहीय. परंतू, एकनाथ शिंदेंनी शिवसेना आपल्यासोबत नेल्याने राज ठाकरे सोबत आले तर उरलेल्या ठाकरे शिवसेनेला फायदा होईल या आशेवर उबाठा शिवसेनेचे नेते बसले आहेत. राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर शिवसेना पक्षासोबत गेलेले शिवसैनिक परत आपल्यासोबत परततील अशी आशा या नेत्यांना आहे. अशातच आता भाजपा-शिंदे गट काय डावपेच आखतात आणि राज ठाकरेंना आपल्याकडे खेचतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या पार्श्वभूमीवर माजी मंत्री ठाकरे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचे वक्तव्य आले आहे. आम्ही आशावादी आहोत, भाजपा दोन भाऊ, दोन पक्ष एकत्र येणार नाही यासाठी प्रयत्न करत आहे. घराघरात भांडण लावून राजकीय स्वार्थ साधला जाईल का, याचा विचार भाजप करत आहे. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तर महानगरपालिकेच्या निवडणुकीत 54 टक्के मते या दोन भावांना मिळतील अशा पद्धतीचा सर्वे आला आहे. त्यामुळे भाजप घाबरलेली आहे, असा दावा जाधव यांनी केला आहे.
शरद पवार गट भाजपमध्ये जाण्यास इच्छुक असल्याच्या वृत्तावरून देखील जाधव यांनी भाजपवर टीका केली आहे. विरोधी पक्षाचे आमदार, खासदारांबद्दल अफवा पसरवणे आणि भाजप बद्दल लोकांचे प्रेम किती वाढले आहे, असा आभास निर्माण करण्याचा रोग भाजपला लागला आहे. संघाच्या स्थापनेला शंभर वर्ष होऊन, त्यांच्या विचारधारेवरील नेतृत्व आणि लोकप्रतिनिधी उभे करू शकले नाही, हा त्यांचा पराभव आहे याचाच विसर या लोकांना पडला आहे. त्यामुळे दुसऱ्या पक्षातील नेतृत्व घेऊन आपला पक्ष मोठा करत सुटले आहेत. सत्तेची आलेली ही सूज आहे. सत्ता गेल्यावर सूज गेल्यावर मात्र वाईट अवस्था होईल, अशी टीका जाधव यांनी केली.
महायुतीला विधानसभेत राक्षसी बहुमत मिळाले, तरी ते एकत्र लढणार आहेत. त्यामुळे आम्ही आघाडी करून एकत्र लढलो, तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला फायदा होईल, असेही जाधव यांनी सांगितले. संघ हा नेहमी भाजपच्या बाजूने मैदानात उतरतो. देशात हिंदुत्वाचा प्रचार असो की राम मंदिर बांधायचा असो. सर्वपक्षाकडे जाती धर्माच्या लोकांकडे जायचे राम मंदिराच्या उभारणीत सगळ्या धर्माच्या लोकांकडून वर्गणी गोळा केली. मुस्लिम धर्मियांकडून सुद्धा वर्गणी गोळा केली. निवडणूक आली की प्रचार मात्र भाजपचा करायचा आहे. ही दुहेरी नीती लोकांच्या लक्षात यायला लागली आहे, असाही आरोप जाधव यांनी केला आहे. जाधव हे नागपूरला आले होते.