गरज पडली तर मोदींनाही भेटेन! आठवलेंनी लोकसभेच्या दोन जागांवर दावा ठोकला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 20:45 IST2023-11-28T20:44:44+5:302023-11-28T20:45:09+5:30
महायुतीमध्ये शिंदे गट शिवसेना आणि राष्ट्रवादीही आहे. यामुळे तीन पक्षांमध्ये जागा वाटल्या जाणार आहेत. भाजपा आपल्या इतर मित्रपक्षांना आपल्या वाट्याला आलेल्या जागा देण्याची शक्यता आहे.

गरज पडली तर मोदींनाही भेटेन! आठवलेंनी लोकसभेच्या दोन जागांवर दावा ठोकला
लोकसभेची निवडणूक लागायला अवघे तीन महिने राहिले आहेत. अशातच महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा महाराष्ट्रात २६ जागा लढविणार असल्याचे जाहीर केले होते. नंतर पुन्हा सारवासारव केली होती. यावर आता केंद्रात मंत्री असलेल्या रामदास आठवले यांनी आपला दावा जाहीर करून टाकला आहे. गरज पडली तर यासाठी मोदींनाही भेटणार असल्याचे आठवलेंनी स्पष्ट केले आहे.
रामदास आठवलेंच्या पक्षाला महाराष्ट्रात दोन जागा हव्या आहेत. यापैकी शिर्डीमधून स्वत: रामदास आठवलेंना लढायचे आहे. आठवलेंनीच आज तशी इच्छा व्यक्त केली आहे. आता शिर्डीची जागा कोणाला सुटणार यावरून महायुतीतील रुसवे फुगवे रंगण्याची चिन्हे आहेत. महायुतीमध्ये शिंदे गट शिवसेना आणि राष्ट्रवादीही आहे. यामुळे तीन पक्षांमध्ये जागा वाटल्या जाणार आहेत. भाजपा आपल्या इतर मित्रपक्षांना आपल्या वाट्याला आलेल्या जागा देण्याची शक्यता आहे.
सामाजिक न्याय मंत्री आठवले यांनी म्हटले की, २००९ मध्ये मी लोकसभा निवडणूक लढविली होती. शिर्डी मतदारसंघातून मी तेव्हा हरलो होतो. परंतू, पुढची लोकसभा निवडणूक शिर्डीतूनच लढण्याची इच्छा आहे. याबाबत मी भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशीही चर्चा केली आहे. अमित शहांशी देखील बोलणार आहे. गरज पडली तर मोदींनाही भेटेन, असे आठवले यांनी म्हटले आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणत्याही प्रकारचा वाद होणे योग्य नाहीय. तामिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला महाराष्ट्रातही स्वतंत्र प्रवर्ग निर्माण करून आरक्षण देता येईल, असे रिपाई आठवले पक्षाचे मत असल्याचे आठवले यांनी म्हटले आहे. मराठा समाजातील गरीब लोकांना न्याय मिळाला पाहिजे पण ते करताना इतर मागासवर्गीयांचे नुकसान होऊ नये, असेही मत आठवले यांनी मांडले आहे.