"तीन वर्षांनंतरही महाराष्ट्र कळत नसेल तर...", अजित पवारांनी घेतला राज्यपालांच्या वक्तव्याचा समाचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 15:04 IST2022-11-20T15:04:11+5:302022-11-20T15:04:38+5:30
Ajit Pawar : राज्यपालांच्या अनावश्यक, अनाकलनीय, निंदनीय वक्तव्यांची, पंतप्रधानांनी गांभीर्याने दखल घेण्याची वेळ आली आहे, असे म्हणत राज्यपालांना सद्बुद्धी लाभो, अशी प्रार्थनाही अजित पवार यांनी केली

"तीन वर्षांनंतरही महाराष्ट्र कळत नसेल तर...", अजित पवारांनी घेतला राज्यपालांच्या वक्तव्याचा समाचार
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून विरोधकांकडून भाजप आणि राज्यपालांवर सडकून टीका केली जात आहे. यातच आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही भाष्य केले आहे.
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी तीन वर्षांहून अधिक काळ राहूनही राज्यपालांना छत्रपती शिवाजी महाराज समजत नसतील, महाराष्ट्र व महाराष्ट्राची लोकभावना कळत नसेल, तर राज्यपाल महोदयांनी पदावर राहण्याबाबत गांभीर्याने पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्वकालिन, सर्वश्रेष्ठ आदर्श राजे आहेत. राजसत्तेचा उपयोग विलासासाठी नव्हे तर लोककल्याणासाठी कसा करता येतो, याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. छत्रपती शिवरायांना आदर्श मानून महाराष्ट्र आजवर घडला, यापुढेही घडत राहील,असे अजित पवार म्हणाले. तसेच, राज्यपालांच्या अनावश्यक, अनाकलनीय, निंदनीय वक्तव्यांची, पंतप्रधानांनी गांभीर्याने दखल घेण्याची वेळ आली आहे, असे म्हणत राज्यपालांना सद्बुद्धी लाभो, अशी प्रार्थनाही अजित पवार यांनी केली
काय म्हणाले होते राज्यपाल?
आम्ही शाळेत शिकत होतो. तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण? तेव्हा ज्यांना सुभाषचंद्र बोस आवडायचे, ज्यांना गांधीजी आवडायचे आणि नेहरू आवडायचे ते त्यांची नावे घ्यायची. मला आता असे वाटते तुम्हाला कोणी विचारले तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला भेटतील. शिवाजी महाराज तर जुन्या युगातील आहेत. मी आधुनिक युगाबाबत बोलत आहे. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.