"मला प्रमोशन मिळायचे असेल, तर सरकार कायम ठेवावे लागेल...", सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानाने चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 10:32 IST2025-04-11T10:31:55+5:302025-04-11T10:32:17+5:30
'या व्याख्यानमालेला जो येतो, त्याचे प्रमोशन होते,' अशा आशयाचा संवाद आयोजक सुराना आणि मुनगंटीवार यांच्यात झाला होता. हाच धागा पकडत मुनगंटीवार यांनी हे भाष्य केले आहे.

"मला प्रमोशन मिळायचे असेल, तर सरकार कायम ठेवावे लागेल...", सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानाने चर्चांना उधाण
राज्यातील फडणवीस सरकारमध्ये यावेळी मंत्रीपद न मिळालेले भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची नाराजी अद्यापही गेलेली दिसत नाही. ते जेव्हा-जेव्हा संधी मिळेल, तेव्हा-तेव्हा आपल्या मनातील खदखद व्यक्त करायला विसरत नाही. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. 'जर मला प्रमोशन मिळायचे असेल, तर सरकार कायम ठेवावे लागेल...,' असे विधान करत मुनगंटीवार यांनी आपल्या मनातील खदखद पुन्हा एकदा बोलून दाखवली. ते नाशिक येथे एका व्याख्यानमालेत बोलत होते.
खरे तर, 'या व्याख्यानमालेला जो येतो, त्याचे प्रमोशन होते,' अशा आशयाचा संवाद आयोजक सुराना आणि मुनगंटीवार यांच्यात झाला होता. हाच धागा पकडत मुनगंटीवार यांनी हे भाष्य केले आहे. त्यांनी सरकारसंदर्भात केलेल्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
"मला प्रमोशन मिळायचे असेल, तर सरकार कायम ठेवावे लागेल..." -
सुराना यांच्या सोबत झालेल्या संवादाचा धागा पकडत मुनगंटीवार म्हणाले, "जेव्हा सुरानाजी म्हणाले की, जो या व्याख्यानमालेला येतो त्याचे प्रमोशन होते. दडपण तर निघाले पण शंका राहिली. शंका यासाठी राहिली की प्रमोशन व्हायचे असेल, तर सरकार कायम रहायला हवे आणि माझे सरकार कायम राहायला हवे हे खरे आहे, तेवढेच उद्याच्या आणि परवाच्या वक्त्याचे नाव बघितल्यानंतर, भीती निर्माण झाली की, जर मला प्रमोशन मिळायचे असेल, तर सरकार कायम ठेवावे लागेल आणि जोजो येतो त्याला प्रमोशन द्यायचे असेल, तर या दोघांना पक्षात घ्यावे लागेल." या व्याख्यानमालेत काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत देखील मार्गदर्शन करणार आहेत.
काही दिवसांपूर्वीच शोभा फडणवीस यांनी दिली होती समज, म्हणाल्या होत्या... -
यावेळी चंद्रपुरात भाजपच्या वर्धापन दिनाचे 2 वेगवेगळे कार्यक्रम झाले. माजी पालकमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतंत्र कार्यक्रम घेतला. तसेच स्थानिक भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी शोभाताई फडणवीस- हंसराज अहीर यांच्यासोबत कार्यक्रम घेतला. एकाच शहरात दोन कार्यक्रम झाल्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू शोभा फडणवीस यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना नाव न घेता धारेवर धरले होते. त्या म्हणाल्या होत्या, "जेव्हा आपला पक्ष केंद्रात आहे, जेव्हा आपला पक्ष महाराष्ट्रभरात आहे, असे असताना या जिल्ह्यात पक्षात भांडणं व्हावीत? येथे एवढा मोठा मेळावा आहे, का मोठ्या मनाने समोर येत नाहीत? का दुसरा मेळावा घेता? यामुळे लोकांच्या मनात काय निर्माण होतं? हा चंद्रपूरचा आमदार आहे. चंद्रपूरला कार्यक्रम घेणे त्याचे काम आहे. सगळ्यांनी मोठेपणा देऊन त्याच्या कार्यक्रमाला हजर राहणे गरजेचे होते. लोक आपल्या पक्षात यायला तयार आहेत. पण इथे आपली भांडणं झाली, तर आपली काँग्रेस झाली असं म्हणणार नाही? आपल्याला आपली काँग्रेस होऊ द्यायची नाही."असे शोभा फडणवीस यांनी म्हटले होते.