होळी आणि जुम्याची नमाज जर सोबत येत असेल तर, वाद कोण करत आहे? दोन्ही समाज आपापल्या प्रथा-परंपरांचे पालन करून संयमाने आपापले सण साजरे केले आणि प्रार्थना केली, तर काहीही त्रास नाही. मात्र, काही लोकांची आपल्या देशात, या बहाण्याने तणाव निर्माण करून दंगे घडवण्याची इच्छा आहे. होळी हा सर्वांना सोबत घेऊन आनंदाने साजरा करायचा सण आहे. रंगाने खेळा, पाण्याने खेळा. राऊत पत्रकारांसोबत बोलत होते.
"...देशाला मोठी किंमत चुकवावी लागेल" -जेव्हा अटलजी, आडवाणी, मुरली मनोहर जोशी होते, तेव्हा तिथे सर्वांच्या घरात होळी होत होती आणि आणि सर्व पक्षाचे लोक, मग ते आमच्या पक्षाचे असोत अथवा विरोधी पक्षाचे. सर्वजण एकत्र येऊन होळी खेळत होते. सर्व धर्माचे लोक यायचे. आज ते वातावरण राहिले नाही. काहींनी वातावरण बिघडवले आहे. हे वातावरण बिघडवायला काही लोकांना मजा वाटते. मात्र, आगामी काळात या वातावरणाची देशाला मोठी किंमत चुकवावी लागेल.
"संकुचितपणा या देशाला आणि आपल्या समाजाला परवडणारा नाही" -आम्ही कुणालाही विरोधक समजत नाही. नक्की आज होळी आहे, रंगपंचमी आहे, एक महत्त्वाचा सण आहे. अनेक वर्षे हा सण सगळे एकत्र येऊन साजरा करत आहोत. आता काल मी दिल्लीत होतो. दिल्लीत मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण आडवाणी, वाजपेयी, असे प्रमुख नेते, त्यांच्या घरी होळी व्हायची आणि सर्व राजकीय पक्षाचे आणि धर्माचे लोक त्या होळीमध्ये सहभागी होत असत. गेल्या काही काळापासून ही प्रथा बंद झाली. आम्ही फार संकुचित होत आहोत आत. हा संकुचितपणा या देशाला आणि आपल्या समाजाला आणि हिंदू धर्मालाही परवडणारा नाही. आमची प्रतिमा जगभरात लिबरल, सहिष्णू अशी आहे. म्हणूनच हिंदू धर्माला जगात मान आहे. आम्ही सर्वांना सामवून घेतो. आमच्या धर्माचे रक्षण करून आम्ही आमच्या संस्कृतीमध्ये त्यांना सामावतो. दुर्दैवाने गेल्या दहा वर्षांमध्ये हा मोकळेपणा आमच्या संस्कृतीतून संपला, नष्ट केला आणि आपण दिवसेंदिवस अधिक संकुचित आणि धर्मांध होण्यासाठी विशिष्ट गट आपल्याला प्रवृत्त करतोय.
हे दिवससुद्धा निघून जातील -होळी हा सण सर्वांनी एकत्र येऊन रंग उधळण्याचा, सुख-दुःखात एकत्र येण्याचा असा सण, उत्सव आहे. आज देशात काय चाललंय? महाराष्ट्रात काय चाललंय? कुठे मशिदी झाकूण ठेवण्याची वेळ येते. कुठे होळी एका बाजूला आणि नमाज दुसऱ्या बाजूला ठीक आहे? हे दिवससुद्धा निघून जातील.